रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग (रॉ) या भारतीय गुप्तचर संस्थेच्या एका एजंटला पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आली असल्याची माहिती सुरक्षा संस्थांनी दिली. त्याला तपासाकरिता इस्लामाबादला पाठवण्यात आले आहे.
अटक झालेला ‘रॉ’चा एजंट बलुचिस्तानी स्वातंत्र्यवादी पक्षांच्या संपर्कात होता व बलुचिस्तानमध्ये कार्यरत होता, असा सुरक्षा दलांचा आरोप आहे. या मोहिमेचे आणखी तपशील देण्यात आले नसले तरी या प्रकरणी तपास सुरू आहे.
कुलभूषण यादव हा भारतीय नौदलात कमांडिंग रँकचा कार्यरत अधिकारी असून, कराची व बलुचिस्तानातील वांशिक दंगलींना मदत केल्याचे त्याने प्राथमिक तपासात मान्य केले आहे. त्याला एका विशेष विमानाने इस्लामाबादला नेण्यात आले असून तेथे सुरक्षा दलांकरवी त्याची चौकशी केली जाईल.
पठाणकोट हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तानचे संयुक्त तपास पथक भारतात येणार असल्याच्या महत्त्वाच्या वेळीच ही अटक झाली आहे. दहशतवाद्यांनी पाकिस्तानी मोबाइल क्रमांकावर केलेल्या संभाषणांचे तपशील भारताने पाकिस्तानला पुरवले आहेत.