Reddit Post Of Chennai Couple On Monthly Expenses: चेन्नईतील एक जोडपं दरमहा ७८ हजार रुपये कमाई करतं. त्यांनी भारतीय शहरांमध्ये पालकत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणे किती कठीण आहे, याचा उलगडा केला आहे. याचबरोबर, मुलांच्या संगोपनाचा खर्च देखील अनेक कुटुंबांना आर्थिक असुरक्षिततेच्या उंबरठ्यावर आणत असल्याचं दाखवून दिलं आहे.

रेडिटवर त्यांची गोष्ट शेअर करताना, या जोडप्यानं मासिक बजेटची माहिती दिली आहे. त्यांना दोघांना मिळून महिन्याला ७८ हजार रुपये पगार आहे. महिन्याचा सर्व खर्च भागवल्यानंतर त्यांच्याकडे केवळ ८ हजार रुपये बचत राहते, असं त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे.

डेकेअरसाठी सर्वाधिक ४६,५०० खर्च

त्यांच्या मासिक खर्चामध्ये घरभाडं आणि ८.५ महिन्यांच्या बाळाच्या डेकेअरसाठी सर्वाधिक ४६,५०० रुपये खर्च येत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. “मुलाच्या बाबतीत वाटाघाटी करता येत नाहीत”, असं सांगत त्यांनी मुलाची सुरक्षितता आणि दैनंदिन काळजी याला प्राधान्य दिलं असल्याचं म्हटलं आहे.

महिन्याकाठी केवळ ८ हजार…

या जोडप्याला किराणा आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसाठी दरमहा १०,००० रुपये खर्च येतो, तर चेन्नईमध्ये प्रवासासाठी दरमहा ८,५०० रुपये लागतात. मुलाच्या डायपरसाठी ३,००० रुपये खर्च होतो. त्यात वीज आणि स्वयंपाकाच्या गॅससाठी प्रत्येकी १,००० रुपयांचा खर्च समाविष्ट आहे. एकूणच, त्यांचा मासिक खर्च ७०,००० रुपये इतका होतो. त्यामुळे सर्व खर्च भागवल्यानंतर महिन्याकाठी केवळ ८,००० रुपयेच उरतात, असं त्यांनी रेडिट पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

नातेवाईकांच्या इच्छेविरुद्ध लग्न

दरम्यान, या जोडप्याला त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचंही त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे. या जोडप्याने त्यांच्या नातेवाईकांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं आहे. त्यामुळे आता त्यांना एकट्यानेच पालकत्वाच्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागत आहेत. “आम्ही पूर्णपणे स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं त्यांनी लिहिलं. तसेच स्पष्ट केलं की, हा आर्थिक दबाव कमी करण्यासाठी पत्नीने अर्धवेळ नोकरी शोधण्यास सुरुवात केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलाच्या संगोपनाचा एकूण खर्च ३८-४५ लाख

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका व्हायरल लिंक्डइन पोस्टमध्ये बेंगळुरूस्थित स्टार्टअप संस्थापक मीनल गोयल यांनी भारतीय शहरांमध्ये आज मुलाच्या संगोपनाचा एकूण खर्च ३८-४५ लाख रुपये असल्याचं म्हटलं होतं. यामध्ये डिलिव्हरी खर्च आणि डेकेअरपासून ते शाळेच्या फी आणि कॉलेजच्या खर्चापर्यंत अशा विविध खर्चांचा समावेश आहे.