पीटीआय, नवी दिल्ली

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने तणाव कमी करावा, असा सल्ला अमेरिकेने पुन्हा एकदा दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी स्वतंत्ररीत्या दूरध्वनीवरून चर्चा केली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर निर्माण झालेला तणाव आणि भारताकडून संभाव्य प्रत्युत्तरात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर रुबियो यांनी जयशंकर यांच्याशी संवाद साधला. यापूर्वी मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलांना दहशतवादाविरोधात ठोस कारवाईसाठी पूर्ण अधिकार दिले होते. बुधवारी रात्री जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेत रुबियो यांनी ‘भयानक’ दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांबाबत संवेदना व्यक्त केल्या व दहशतवादाविरोधात भारताला सहकार्य करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली, असे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

चर्चेदरम्यान, जयशंकर यांनी रुबियो यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगार, समर्थक आणि कट रचणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे ठणकावून सांगितले. तसेच हल्ल्याचे सूत्रधार सीमेपलीकडे असून गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे पहलगाम हल्ल्याच्या तपासात भारताला संपूर्ण सहकार्य करावे, असेही रुबियो यांनी शाहबाज शरीफ यांना बजावल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी दिली.

संरक्षण दलामध्ये व्यापक फेरबदल

● पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण दलात उच्च स्तरावर व्यापक फेरबदल करण्यात आले.

● गुरुवारी झालेल्या घडामोडींमध्ये लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांनी उत्तर कमांडचे जनरल ऑफिसर इन कमांडिंग इन चीफ, मेजर जनरल लिस्म्मा पी. व्ही. यांनी मिलिटनरी नर्सिंग सर्व्हिसच्या अतिरिक्त महासंचालक, तर एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी ‘सीआयएससी’चे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

● भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडचे लेफ्टनंट जनरल एम .व्ही. सुचिंद्र कुमार निवृत्त झाले असून त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शर्मा यांना व्यापक मोहिमांचा अनुभव आहे. डिसेंबर १९८७ मध्ये ते मद्रास रेजिमेंटमध्ये नियुक्त झाले होते.

● ३३०० तासांहून अधिक उड्डाणांचा अनुभव असलेले एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची गुरुवारी एकात्मिक संरक्षण कर्मचारी (सीआयएससी) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. लेफ्टनंट जनरल जे.पी. मॅथ्यू यांची ते जागा घेतील. दीक्षित यांना अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक आणि वायू सेना पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● मेजर जनरल लिस्म्मा पीव्ही यांनी मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. मेजर जनरल शिना पी.डी. या चार दशकांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्या असून त्यांची जागा लिस्म्मा यांनी घेतली.