नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने तणाव कमी करावा, असा सल्ला अमेरिकेने पुन्हा एकदा दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी स्वतंत्ररीत्या दूरध्वनीवरून चर्चा केली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर निर्माण झालेला तणाव आणि भारताकडून संभाव्य प्रत्युत्तरात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर रुबियो यांनी जयशंकर यांच्याशी संवाद साधला. यापूर्वी मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलांना दहशतवादाविरोधात ठोस कारवाईसाठी पूर्ण अधिकार दिले होते.

बुधवारी रात्री जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेत रुबियो यांनी ‘भयानक’ दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांबाबत संवेदना व्यक्त केल्या व दहशतवादाविरोधात भारताला सहकार्य करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली, असे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. चर्चेदरम्यान, जयशंकर यांनी रुबियो यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगार, समर्थक आणि कट रचणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे ठणकावून सांगितले. तसेच हल्ल्याचे सूत्रधार सीमेपलीकडे असून गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे पहलगाम हल्ल्याच्या तपासात भारताला संपूर्ण सहकार्य करावे, असेही रुबियो यांनी शाहबाज शरीफ यांना बजावल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वसंरक्षणाच्या अधिकाराला पाठिंबा रुबिया आणि जयशंकर यांच्यात बुधवारी रात्री चर्चा झाल्यानंतर गुरुवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पीट हेगसेथ यांनीही परराष्ट्रमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे हेगसेथ म्हणाले. अमेरिका भारताबरोबर एकजुटीने उभा असल्याची ग्वाही हेगसेथ यांनी दिली, तर पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देणारा आणि प्रदेशात अस्थिरता निर्माण करणारा देश असल्याचे पहलगाम हल्ल्यामुळे स्पष्ट झाल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.