दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं अभूतपूर्व असं यश मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या रुपाने दुसरा धक्का दिला. एकीकडे अरविंद केजरीवाल यांना पराभूत करणाऱ्या परवेश वर्मांचं नाव दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असताना पक्षानं पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या रेखा गुप्ता यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रं सोपवली. त्यामुळे रेखा गुप्ता व त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा दुहेरी आनंद ठरला. आज रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या सासू मीरा गुप्ता यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.

दिल्लीच्या रामलीला मैदानावर रेखा गुप्ता यांचा शपथविधी सोहळा पार पडला. रेखा गुप्ता यांच्याप्रमाणेच भाजपाच्या एकूण सहा नवनिर्वाचित आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये परवेश वर्मा यांच्यासह मनजिंदर सिंग सिरसा (राजौरी गार्डन), रविंद्र कुमार इंद्रज (बवाना), कपिल मिश्रा (करवाल नगर), आशिष सूद (जनकपुरी) आणि पंकज कुमार सिंग (विकासपुरी) यांचा समावेश आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

रेखा गुप्ता यांचं सासूकडून कौतुक!

दरम्यान, रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या सासूने त्यांचं कौतुक करणारी प्रतिक्रिया एएनआयला दिली. “रेखा घरही सांभाळत होती, समाजही सांभाळत होती. तिनं दोन वर्षं संपूर्ण शालिमार सांभाळलं. तिची काम करण्याची सवय आहे. मला इतका आनंद झालाय, लोकांनी मला इतक्या शुभेच्छा दिल्यात की माझी झोळी आता त्या स्वीकारण्यासाठी कमी पडतेय”, असं मीरा गुप्ता एएनआयला म्हणाल्या.

दरम्यान, बुधवारी रात्री रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर झाल्यानंतरदेखील मीरा गुप्ता यांनी आनंद झाल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती, “मला खूप आनंद होत आहे आता. ती राज्यासाठीही चांगलं काम करेल. रेखा गुप्ता माझ्यासाठी अजूनही माझी सूनच आहे. समाजासाठी ती मुख्यमंत्री असेल”, असं त्या म्हणाल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेखा गुप्तांच्या मुलाला आईच्या कार्यक्षमतेवर विश्वास

एकीकडे सासूकडून रेखा गुप्ता यांना कौतुकाची थाप मिळाली असताना दुसरीकडे मुलानंही त्यांच्या कार्यक्षमतेवर दृढ विश्वास व्यक्त केला आहे. “आम्हाला आईचा खूप अभिमान वाटतोय. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही त्यांना काम करताना पाहिलं आहे. त्यांच्यावरचा सगळा ताण पाहिला आहे. आम्हाला ते पाहून कळतं की राजकारण किती अवघड गोष्ट आहे. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर हे यश मिळवलं आहे. आम्हाला त्यांचा फार अभिमान वाटतो. मला माझ्या आईवर, पक्षावर पूर्ण विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया रेखा गुप्ता यांचा मुलगा निकुंज गुप्ता यानं दिली आहे.