Rekha Gupta on EVM Hack Claims: लोकसभेचे विरोधीपक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेक वेळा ईव्हीएमबाबत (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) संशय व्यक्त करत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. राहुल गांधींचं म्हणणं आहे की “ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रियेत फेरफार होऊ शकतो आणि त्यामुळे निवडणुकीचा निकाल प्रभावित होऊ शकतो, ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलता येऊ शकतो”. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी निवडणूक ही ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे घ्यावी अशी मागणी केली आहे. मात्र, केंद्र सरकार व निवडणूक आयोगाने विरोधकांचे आरोप व मागण्या फेटाळून लावल्या आहेत.

दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री तथा भाजपा नेत्या रेखा गुप्ता यांनी “आम्ही ईव्हीएम हॅक केलं तर त्यांना (विरोधकांना) वाईट वाटतंय”, असं वक्तव्य करत ईव्हीएमबाबतचे आरोप एक प्रकारे मान्य केल्याचा दावा आम आदमी पार्टीने केला आहे. रेखा गुप्ता यांनी नुकतीच एनडीटीव्हीला एक मुलाखत दिली. यावेळी रेखा गुप्ता यांना माध्यम प्रतिनिधीने विरोधकांच्या आरोपावर बोलतं केलं.

रेखा गुप्ता नेमकं काय म्हणाल्या?

माध्यम प्रतिनिधी म्हणाली, “विरोधक दावा करत आहेत की ईव्हीएमच्या कृपेने भाजपा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (भाजपाची विद्यार्थी शाखा) आणि त्यांचे मित्रपक्ष निवडणुका जिंकत आहेत. निवडणूक आयोगही तुमच्याच बाजूने आहे. यावर रेखा गुप्ता म्हणाल्या, “७० वर्षांपासून ते लोक (काँग्रेस) ईव्हीएम हॅक करत होते तर त्यांना काही फरक पडत नव्हता, आता आम्ही केलं तर त्यांना वाईट वाटंतंय, हे चांगलंय.”

अरविंद केजरीवालांकडून व्हिडीओ शेअर

रेखा गुप्ता यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. आम आदमी पार्टीने देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हा व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “दिल्लीच्या काय म्हणतायत एकदा बघा.”

रेखा गुप्तांचा काँग्रेसबद्दलचा दावा खोटा?

दरम्यान, या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. रेखा गुप्ता यांनी काँग्रेसवर ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप केला आहे त्यावर एका एक्स युजरने म्हटलं आहे की “रेखा गुप्ता म्हणतायत, काँग्रेस ७० वर्षांपासून ईव्हीएम हॅक करत आलं आहे. मात्र, पूर्वी भारतात निवडणुका ईव्हीएमवर होत नव्हत्या.”

भारतात २००४ पासून आतापर्यंत पाच लोकसभा निवडणुका या ईव्हीएमवर घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन निवडणुका भाजपाने जिंकल्या आहेत. २००४ च्या आधी भारतात मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेतल्या जात होत्या.