वॉशिंग्टन : अमेरिकेला पाकिस्तानबरोबर सामरिक संबंध वाढवण्याची इच्छा आहे, पण त्यासाठी भारताबरोबरचे ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण संबंध धोक्यात टाकणार नाही अशी ग्वाही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी रविवारी दिली. रुबियो आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची सोमवारी मलेशियामध्ये ‘आसिआन’ परिषदेनिमित्त भेट होत आहे. त्यापूर्वी त्यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली.

भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे हळूहळू थांबवण्याचे मान्य केले असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सांगितले. त्याचा पुनरुच्चार मार्क रुबियो यांनीही मलेशिया भेटीपूर्वी पत्रकारांशी बोलताना केला. आता भारत विविध देशांकडून तेल खरेदी करणार असल्याचे रुबियो म्हणाले. यावेळी अमेरिकेच्या पाकिस्तानबरोबरच्या संबंधांबद्दल भारताला स्वाभाविक कारणांमुळे चिंता वाटते, असे रुबियो यांनी मान्य केले. मात्र, पाकिस्तानबरोबर मैत्रीसाठी अमेरिका भारताबरोबरचे संबंध खराब करणार नाही, असे ते म्हणाले.

मुत्सद्देगिरी आणि तत्सम बाबींबाबत भारतीय अतिशय प्रगल्भ आहेत. आमचे ज्या देशांबरोबर संबंध नाहीत, अशा काही देशांबरोबर भारताचे संबंध आहेत. त्यामुळे हा व्यावहारिक परराष्ट्र धोरणाचा भाग आहे. आमचे पाकिस्तानशी असलेल्या संबंधांमुळे भारताबरोबरचे संबंध बिघडणार नाहीत. अमेरिका-भारत संबंध ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण आहेत. – मार्को रुबियो, परराष्ट्रमंत्री, अमेरिका