पीटीआय, वायनाड (केरळ) केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनांच्या मालिकेमुळे हाहाकार माजला असून अद्याप अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. सैन्य, नौदल आणि एनडीआरएफस स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलांच्या पथकांनी शोध व बचावकार्य हाती घेतले असले, तरी मुसळधार पाऊस आणि खराब हवेमुळे त्यात अडचणी येत आहेत. भूस्खलनानंतर पोतुकल गावामध्ये चलियार नदीमधून १६ मृतदेह आढळून आले आहेत. त्याबरोबरच बचाव कर्मचाऱ्यांना नद्या आणि चिखलामधून शरीराचे अवयव सापडले. ते एकाच व्यक्तीचे आहेत की वेगवेगळ्या याची ओळख पटवण्यासाठी वैद्याकीय तपासणी केली जात आहे. वायनाड हा डोंगराळ भाग आहे. भूस्खलनांची तीव्रता इतकी होती की त्यामुळे काही गावे पूर्णत: ढिगाऱ्याखाली गाडली गेली. ढिगाऱ्याखाली जिवंत व्यक्तींचा शोध घेतला जात असून जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथके अथकपणे काम करत आहेत. बचाव कर्मचाऱ्यांना नद्या आणि चिखलामधून शरीराचे अवयव सापडत आहेत. त्यामुळे मृतांचा नेमका आकडा निश्चित करणे कठीण आहे असे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, केरळ सरकारने बचाव मोहिमेसाठी लष्कराची मदत मागितल्यानंतर ‘१२२ इन्फंट्री बटालियन मद्रास’चे ४३ सदस्यीय पथक पाठवण्यात आले आहे. त्याबरोबरच २०० जवान, वैद्याकीय पथके, कन्नूरच्या ‘डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स’ (डीसीएस) केंद्राकडून उपकरणे आणि कोझिकोडमधून प्रादेशिक सैन्य तैनात करण्यात आले आहेत. हवाई दलाची दोन हेलिकॉप्टरही दुर्घटनाग्रस्त भागात पाठवण्यात आली आहेत. कन्नूरमधून नौदलाची ‘रिव्हर क्रॉसिंग टीम’ आणि सैन्याचे श्वानपथकदेखील सहभागी झाले आहेत. हेही वाचा >>>Nirmala Sitharaman: अर्थसंकल्पाचा हलवा कुणी खाल्ला? राहुल गांधींच्या आरोपाला अर्थमंत्री सीतारमण यांचे उत्तर; म्हणाल्या… शहारे आणणारे अनुभव या दुर्घटनेतून वाचलेल्या काहींनी आपापले अनुभव सांगितले. एका वयस्कर दाम्पत्याचे घर उद्ध्वस्त झाले. मात्र, त्यापूर्वीच आदल्या रात्री ११ वाजता त्यांना चिखलाचे पाणी वाहताना दिसले. त्यानंतर त्यांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी त्यांनी शेजाऱ्यांनाही बरोबर यायला सांगितले. ‘‘पण त्यांनी ऐकले नाही, रात्री १ वाजता येतो असे ते म्हणाले. पण आता ते आलेच नाहीत. आता ते दिसत नाहीत,’’ असे या वयोवृद्ध इसमाने गदगदलेल्या स्वरात सांगितले. एका महिलेने तिला तिच्या नातेवाईकांनी फोन केल्याचे सांगितले. ते त्यांच्या बाळाला घेऊन निघाले होते, मात्र नंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. घटनास्थळी हृदयद्रावक दृश्ये घटनास्थळी उद्ध्वस्त झालेली घरे, नद्यांची वाढलेली पातळी आणि उन्मळून पडलेल्या झाडांच्या मोडलेल्या फांद्या असे दृश्य दिसत होते. निसर्गसौंदर्याने ओळखल्या जाणाऱ्या या भागाला निसर्गाच्याच रौद्ररुपाने तडाखा दिला. पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली अनेक वाहने झाडांच्या खोडांना अडकून पडल्याचे दिसत होते. पाण्याची पातळी वाढलेल्या नद्यांनी आपला मार्ग बदलला आणि त्या वस्त्यांमध्ये शिरल्या. त्यामुळे अधिक नुकसान झाले. डोंगरावरून खाली आलेल्या मोठमोठ्या दगडांमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. केरळच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून घटनेची माहिती घेतली. केंद्रातर्फे शक्य ती सर्व मदत केली जाईल असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी बुधवारी सकाळी वायनाडला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ● केरळमध्ये दोन दिवसांचा दुखवटा जाहीर ● ४५ मदत शिबिरांमध्ये ३,०६९ जणांचे पुनर्वसन ● मदतीसाठी स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात फोन ● पूल व रस्ते वाहून गेल्याने संकटात भर ● मुख्यमंत्र्यांचे ओएसडी एस कार्तिकेयन यांच्यावर समन्वयाची जबाबदारी