पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा उघड होऊन बँकेने गुन्हा दाखल करण्यापूर्वीच नीरव मोदी देशातून बाहेर निघून गेलेला असे स्पष्ट करतानाच देशातील सर्व बँकेची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाही, अशा शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांना सुनावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यात त्यांनी नीरव मोदी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. नीरव मोदी प्रकरणासाठी भाजपा जबाबदार नाही. भ्रष्टाचाराविरोधात मोदी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी नीरव मोदी प्रकरणावरुन भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. यावर प्रत्युत्तर देताना अमित शहा म्हणतात, राहुल गांधी यांच्या भाषणाची पत्रकार दखल घेतील, पण जनता त्याची दखल घेणार नाही. जनतेला सर्व काही माहित आहे. विरोधकांना मोदी सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता आलेले नाही. नीरव मोदी प्रकरणात भाजप नेत्याचा सहभाग असल्याचे राहुल गांधी यांनी सिद्ध करावे, असे आव्हानच त्यांनी दिले. काँग्रेसच्या काळात विरोधकांनी आरोप केले नव्हते. कॅग किंवा अन्य संस्थांच्या तपासातून भ्रष्टाचार उघड झाला होता. कोर्टात जनहित याचिका झाल्याने काही प्रकरण समोर आली होती, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांना इतकच असेल त्यांनी देखील आरोप करण्याऐवजी कोर्टात जावे, असा सल्लाही त्यांनी दिला. देशातील प्रत्येक बँकेची जबाबदारी पंतप्रधान मोदी घेऊ शकत नाही. यासाठीच प्रत्येक विभागाला जबाबदारी वाटून देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

राफेल करारात भ्रष्टाचार झालेला नाही. राहुल गांधी हे काही देव नाही. जर सरकारने कराराबाबतची माहिती लपवली असती तर या कराराचा तपशील राहुल गांधींना कसा समजला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेना, तेलगू देसम पक्ष अशा महत्त्वाच्या पक्षांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याबाबत विचारले असता शहा म्हणाले, मित्रपक्षांनी एनडीएतून बाहेर पडू नये असे आम्हालाही वाटते. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय त्या पक्षांनीच घेतला, असे त्यांनी सांगितले. विश्वासदर्शक ठराव आल्यास आम्ही ३०० पेक्षा जास्त मते मिळवू, असा दावा त्यांनी केला. २०१९ मधील निवडणुकीत २०१४ मधील निवडणुकीपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Responsibility of all banks cannot lie with the pm narendra modi says bjp chief amit shah
First published on: 22-03-2018 at 07:47 IST