ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्विगीच्या डिलिव्हरी एजंटने ऑर्डर तयार करण्यास विलंब केल्यामुळे दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथील एका रेस्टॉरंटच्या मालकाची गोळ्या झाडून हत्या केली. डिलीव्हरी एजंटचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

ठार झालेला व्यक्ती मित्रा नावाच्या निवासी संकुलाच्या आत एक रेस्टॉरंट चालवत होता. मंगळवारी उशिरा, स्विगी एजंट चिकन बिर्याणी आणि पुरी भाजीची ऑर्डर घेण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये पोहोचला. बिर्याणी वेळेवर तयार होती. दरम्यान, डिलीव्हरी एजंटला एका कामगाराने सांगितले की दुसऱ्या ऑर्डरला थोडा वेळ लागेल. यावरुन दोघांमध्ये वाद झाला, त्यानंतर डिलिव्हरी एजंटने रेस्टॉरंट कर्मचाऱ्याला शाब्दिक शिवीगाळ केली.

दरम्यान, रेस्टॉरंट मालक सुनील अग्रवाल यांनी हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी डिलिव्हरी एजंटने त्याच्या मित्राच्या मदतीने त्यांच्या डोक्यात गोळी झाडल्याचा आरोप आहे. रेस्टॉरंटचे कर्मचारी मालकाला रुग्णालयात घेऊन गेले जेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

पोलीस अधिकारी विशाल पांडे म्हणाले, “ऑर्डर तयार करण्यास विलंब होत असल्याने डिलिव्हरी बॉयने रेस्टॉरंट मालकाची हत्या केल्याचा संशय आहे. गुन्हेगाराला पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत.”