न्यायालयाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर राजकारण आणलं जातं आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे काही वकीलच हे करत आहेत. ही बाब न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने चिंतेची आहे असं परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केलं. अनेकदा असं घडतं की एखाद्या न्यायाधीशाने दिलेला निर्णय अनेकांना पटत नाही. त्यावर त्या निर्णयावर टीका केली जात नाही तर न्यायाधीशाच्या हेतूवर शंका घेतली जाते, असं घडता कामा नये असंही चंद्रचूड म्हणाले.
काय म्हणाले धनंजय चंद्रचूड?
एखादा निर्णय आवडला नाही तर त्याबाबत कुणालाही त्याबाबत मत मांडू शकता. निर्णय आवडला नाही म्हणून तुम्ही टीका करु शकता किंवा निर्णय आवडला म्हणून स्वागतही करु शकता. पण हल्ली असा एक ट्रेंड आला आहे न्यायाधीशांनाच नावं ठेवली जातात. ही बाब दुर्दैवी आहे. निर्णय पटला नाही तर ते मला अगदीच मान्य नाही. पण त्यामागे न्यायाधीशांचा काहीतरी हेतू आहे हे सांगणं हे योग्य नाही. सगळे वकील असे नाही पण काही वकील असं करतात जे योग्य नाही. द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत डी. वाय. चंद्रचूड यांनी हे वक्तव्य केलं आहे.
न्यायालयाच्या कामकाजात राजकाण आणण्याचा प्रयत्न होतो आहे-चंद्रचूड
न्यायालयाच्या कामकाजात खूप जास्त राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे एखादा निर्णय पटला नाही की थेट त्या न्यायाधीशाच्या हेतूवर संशय घेतला जातो. त्याने विशिष्ट हेतूने तो निर्णय दिला असेल असं म्हटलं जातं. तुम्ही न्यायाधीशांवर टीका करण्याऐवजी त्याने दिलेला निर्णय आवडला नाही म्हणून टीका करु शकता. न्यायदानाचं शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये तर हे रोज होतं की तुम्ही एखाद्या निर्णयाला पाठिंबा देता किंवा एखाद्या निर्णयावर टीका करता. पण न्यायाधीशांवर जेव्हा हेतू लादला जातो तेव्हा न्यायव्यवस्थेवर जो लोकांचा विश्वास आहे त्याला कुठे तरी तडा देण्याचं काम केलं जातं आहे, असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.
यशवंत वर्मा प्रकरणाबाबत काय म्हणाले डी. वाय चंद्रचूड?
यशवंत वर्मा प्रकरणात संसदेने समिती तयार केली आहे. त्यात तीन सदस्य आहेत. या समितीने या प्रकरणी तपास सुरु केला आहे. यातला सर्वात महत्त्वाचा भाग काय? की त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार प्रदान केला जावा. मी मागच्या २५ वर्षांपासून न्यायाधीश म्हणून काम केलं आहे. त्याआधी मी वकिलीही केली आहे. माझा हा अनुभव आहे की अनेकदा आपल्या समोर जे येतं ते सत्य नसतं त्यापेक्षा वेगळं असतं. सत्याचे अनेक पैलू असतात ते नंतर समोर येतात. त्यामुळे यशवंत वर्मा प्रकरणात समितीसमोर सत्य आलं पाहिजे. त्यानंतर ते समाजासमोरही आलं पाहिजे असं मत चंद्रचूड यांनी मांडलं.