लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात १०२ जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही विरोधात इंडिया आघाडी असा सामना बहुतेक ठिकाणी होत आहे. पहिल्या टप्प्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत. त्यातील काही मतदारसंघांतील लढतींचा आढावा

पिलिभित (उत्तर प्रदेश)

भाजपने यंदा वरुण गांधी यांना उमेदवारी नाकारल्याने उत्तर प्रदेशातील पिलिभित मतदारसंघ चर्चेत आला आहे. १९९६ पासून पिलिभितमधून आधी मनेका गांधी आणि नंतर वरुण गांधी विजयी झाले आहेत. यंदा मात्र, चार वर्षांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जितीन प्रसाद यांना  येथून उमेदवारी देण्यात आली आहे. ते स्वत:चा उल्लेख ‘मोदींचा दूत’ असा करतात. त्यांच्यासमोर समाजवादी पक्षाचे भगवत सरन गंगवार आणि बसपचे अनिस अहमद खान उर्फी फूलबाबू यांचे आवाहन आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्राबल्य असलेल्या आणि पिलिभित व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या मतदारसंघामध्ये वन्य प्राणी (वाघ आणि अस्वल) आणि मानवादरम्यानचा संघर्ष हा प्रमुख मुद्दा आहे.

कोईम्बतूर (तमिळनाडू)

तमिळनाडूतील सर्वात लक्षणीय ठरलेल्या कोईम्बतूर मतदारसंघातील लढतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई हे बाजी मारणार का, याची राष्ट्रीय राजकारणात उत्सुकता आहे. कोईम्बतूर मतदारसंघात तमिळींबरोबरच बिहारी, उत्तर भारतीय  मोठया प्रमाणावर मतदार आहेत. राज्यात द्रमुक व अण्णा द्रमुक या प्रादेशिक पक्षांचा पगडा असला तरी कोईम्बतूर मतदारसंघातून काँग्रेस, डावे पक्ष, भाजप या राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार निवडून आले आहेत. १९९८ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या सभेपूर्वी कोईम्बतूर शहरात बॉम्बस्फोट झाले होते. तेव्हा मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपला विजय मिळाला होता. अशा या जातीयदृष्टया संवेदनशील आणि यंत्रमागाचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोईम्बतूर मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. १९९८ आणि १९९९ च्या विजयानंतर तब्बल २५ वर्षांनी भाजपने विजय संपादन करण्याकरिता सारी ताकद पणाला लावली आहे.

चुरु (राजस्थान)

राजस्थानातील चुरु मतदारसंघातील लढतीने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. हा मतदारसंघ सलग ३० वर्षे भाजपच्या ताब्यात आहे. दोन वेळा भाजपकडून विजयी झालेले राहुल कासवान यांना यंदाही उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. त्यांना डावलल्याने पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. भाजपने पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवलेला भालाफेकपटू देवेंद्र झाजरिया यांना उमेदवारी दिली आहे. कासवान आणि झाजरिया हे दोघेही जाट समुदायाचे आहेत. चुरुमध्ये जाट आणि राजपूत समाजाची मते महत्त्वाची आहेत. मागील निवडणुकीत हे दोन्ही समाज भाजपच्या पाठीशी उभे राहिले होते. कासवान यांचे तिकीट कापण्यामागे भाजपच्या राजेंद्र राठोड यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. राठोड हे सात वेळा आमदार राहिले असून राजपूत समुदायाचे महत्त्वाचे नेते आहेत.

िंदवाडा (मध्य प्रदेश)

मध्य प्रदेशातील छिंदवाडा हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा बालेकिल्ला आहे.  त्यांचा मुलगा नकुल नाथ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात भाजपने विवेक बंटी साहू यांना तिकीट दिले आहे. कमलनाथ यांचे अनेक समर्थक काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. खुद्द कमलनाथ हेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा होत्या. दुसरीकडे भाजपने छिंदवाडयात विजय मिळवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. मतदारसंघातील सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचा प्रचार टिपेला पोहोचला आहे. तर, आपली पारंपरिक जागा आणि राजकारणातील प्रतिष्ठा टिकवण्यासाठी कमलनाथ यांनीही स्वत:ला झोकून दिले आहे.

गया  (बिहार)

बिहारच्या गयामध्ये रालोआतर्फे ‘हिंदूस्तानी अवामी मोर्चा’चे जितन राम मांझी निवडणूक लढवत आहेत.  मांझी गेल्या ४० वर्षांपासून सक्रिय राजकारणात असून आतापर्यंत आठ वेळा त्यांनी पक्ष आणि आघाडी बदलली आहे. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा गयामधून निवडणूक लढवली आहे, मात्र त्यांना एकदाही यश मिळालेले नाही. आता चौथ्यांदा तरी मतदारांचा विश्वास जिंकण्यात त्यांना यश मिळेल का याकडे लक्ष आहे. त्यांच्याविरोधात इंडिया आघाडीतर्फे राजदचे कुमार सर्वजीत रिंगणात आहेत. विशेष म्हणजे जतिन मांझी यांनी १९९१साली पहिल्यांदा लोकसभा निवडणूक सर्वजीत यांचे वडील राजेश कुमार यांच्या विरोधात लढवली होती. मागील वेळी हा मतदारसंघ संयुक्त जनता दलाने जिंकला होता.