पीटीआय, लखनऊ
उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील नून नदीचे पुनरुज्जीवन ही केवळ जिल्ह्यासाठी नाही तर संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाची घटना मानली जात आहे. ही नदी कानपूर या चामड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक शहरातून वाहते. मृत नद्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘एक जिल्हा-एक नदी’ हा उपक्रम या नदीच्या मदतीला धावून आला आहे.
नून नदीत टाकला जाणारा राडारोडा, काँक्रिटचा गाळ आणि अतिक्रमण यामुळे ही नदी गायब झाली होती. या नदीच्या पुनरुज्जीवनाचे प्रारूप राज्यासाठी प्रेरणादायी असल्याचे राज्य सरकारने प्रसृत केलेल्या निवेदनात म्हटले आहे. नूनबरोबर गोमती नदीच्या पिली या जौनपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदीचेही सार्वजनिक प्रयत्नातून पुनरुज्जीवन करण्यात यश आल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. याचे श्रेय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिले जात आहे.
एकेकाळी बिल्हौर, शिवराजपूर आणि चौबेपूर या भागातील शेतजमिनीला नून नदीचे पाणी मिळत असे. त्या भागातील ग्रामीण संस्कृतीचाही ही नदी महत्त्वाचा भाग होती. मात्र, अतिक्रमणे आणि सिमेंट-काँक्रिटचा भर यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह पूर्णपणे अडला गेला आणि हळूहळू ही नदी मृतावस्थेत गेली. न्यायदंडाधिकारी जितेंद्र प्रताप सिंह आणि मुख्य विकास अधिकारी दीक्षा जैन यांच्यावर नदीच्या पुनरुज्जीवनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
पुनरुज्जीवन उपक्रमासाठी निवड
एक जिल्हा-एक नदी या उपक्रमासाठी नून नदीची निवड करण्यात आली. या नदीची एकूण लांबी ४८ किलोमीटर लांब होती. गावकऱ्यांकडून घेतलेली माहिती, ड्रोन सर्वेक्षणे आणि उपग्रहांकडून मिळवलेल्या प्रतिमा यांच्या सहाय्याने नदीचा मार्ग शोधला गेला. त्यानंतर एक मोहीम राबवून स्थानिकांना सहभागी करून घेण्यात आले. मनरेगाअंतर्गत नदी मार्गात स्वच्छता, खनन, राडारोडा हटवणे, नदीकाठ निश्चित करणे ही कामे करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून जवळपास दोन दशके मृतावस्थेत झालेली नदी आता पुन्हा वाहू लागली आहे. या कामात जवळपास सहा हजार कर्मचारी सहभागी झाले होते. एकूण खर्च ५७ लाख इतका आला.