बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष सहभागी नसलेले राजदचे नेते लालू प्रसाद यादव सोशल मीडियातून मात्र नितीश कुमारांना चिमटे काढताना दिसत आहेत. भाजपावर टीका करत वेगळे झालेल्या नितीश कुमारांवर लालू प्रसाद यादव यांनी जुना व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला आहे.

बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण तापलेलं आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी राजकीय दवडताना दिसत नाहीयेत. भाजपा अन् जदयूचं सध्या सख्य असलं तरीही यापूर्वी नितीश कुमारांनी सडेतोड टीका करत भाजपाची साथ सोडली होती. त्या टीकेचा व्हिडीओच लालूंनी ट्विट केला आहे.

राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार सध्या भाजपासोबत विधानसभा निवडणूक लढवत आहे. २०१४मध्येही जदयू आणि भाजपासोबत होते. मात्र, धर्मनिरपेक्षतेच्या वादावरून नितीश कुमारांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर पुन्हा ते राजदसोबत सत्तेत विराजमान झाले होते.

२०१४ मध्ये भाजपा प्रणित एनडीएतून बाहेर पडताना नितीश कुमार यांनी भाजपा टीका केली होती. या टीकेचा व्हिडीओ लालू प्रसाद यादव यांनी ट्विट केला आहे. “डायलॉग सुनिए डायलॉग! एखादा व्यक्ती सार्वजनिक जीवनात इतका भूमिका नसलेला, धोरण नसलेला, नियत नसलेला, नैतिकता नसलेला आणि विचार नसलेला कसा असून शकतो?,” असं म्हणत लालूंनी नितीश कुमारांवर टीका केली आहे.

“आम्ही राहू नाहीतर मातीत मिळू, पण भाजपासोबत जाणार नाही”

व्हिडीओत नितीश कुमार सभागृहात बोलत आहेत. त्यात ते म्हणाले, “यानंतर कोणत्याही परिस्थितीत परत जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आम्ही राहू नाहीतर मातीत मिसळू, पण पुन्हा तुमच्यासोबत (भाजपा) भविष्यात कधीही तडजोड केली जाणार नाही. हे अशक्य आहे. आता हे शक्य नाही. असंभव आहे. आता तो अध्याय संपला आहे, कारण तो आपण तोडला आहे,” असं नितीश कुमार यांनी भाजपासोबत काडीमोड घेतल्यानंतर म्हटलं होतं.