Rohtak ASI Sandeep Kumar suicide IPS Puran Kumar Case : हरियाणातील रोहतक येथे तैनात असलेल्या एका सहायक पोलीस उप-निरीक्षकाने (ASI) मंगळवारी कथितरित्या आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या पोलीस अधिकार्‍याने एक तीन पानी चिठ्ठी आणि सहा मिनिटांचा एक व्हिडिओ तयार करून ठेवला आहे, ज्यामध्ये त्यांनी दिवंगत आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. रोहतक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एएसआय संदीप कुमार हे सायबर सेलमध्ये तैनात होते.

“होय, ते (संदीप कुमार) आता हयात नाहीत. प्रथमदर्शनी, त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते आहे. आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत आणि अधिक माहिती गोळा केली जात आहे,” असे एका वरिष्ठ हरियाणा पोलीस अधिकार्‍याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

संदीप यांनी सुशिल यांना कसे अटक करण्यात आले होते याबद्दलही सविस्तर माहिती दिली आहे. तसेच व्हिडीओ आणि कथित सुसाईड नोटमध्ये संदीप यांनी, “वाय पूरन कुमार आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेची चौकशी करावी,” अशी मागणी केली आहे.

एगाअधिकाऱ्याने सांगितले की संदीप यांची वाय. पूरण कुमार यांच्या जवळचे सहकारी हेड कॉन्स्टेबल सुशिल कुमार यांच्या अटकेमध्ये महत्त्वाची भूमिका होती, जो स्वतःला त्यांचे पर्सनल सेक्युरिटी ऑफिसर असल्याचे सांगत असे. सुशिल याला वाय. पूरण हे चंदीगड येथील घरात मृत अवस्थेत आढळण्याच्या एक दिवस आधी, म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती.

नेमकं प्रकरण काय आहे?

हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) वाय. पूरन कुमार यांनी त्यांच्या चंदीगड येथील घरात आत्महत्या केली. कुमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती जी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या सुसाइड नोटमध्ये त्यांनी कार्यालयातील समस्यांचा उल्लेख केला होता. तसेच हरियाणाचे पोलीस महासंचालक शत्रूजीत कपूर व रोहतकचे पोलीस अधीक्षक नरेंद्र बिजारनिया यांची नावं नमूद केली होती. यानंतर आता हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. पूरन कुमार यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलीस महासंचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यांना रजेवर पाठवण्यात आलं आहे.

पूरन कुमार यांनी नऊ पानांची सुसाइड नोट लिहून ठेवली होती, ज्यामध्ये १३ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद, बेकायदेशीर पदोन्नती, जातीय भेदभाव, प्रशासनिक छळ यांसारख्या मुद्द्यांवरून त्यांनी मुख्यमंत्री व अनेक वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना पत्रे लिहून नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या सुसाइड नोटमध्ये देखील या बाबी नमूद होत्या. पूरन कुमार यांच्या आत्महत्येचं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस व या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेलं विशेष तपास पथकाने (एसआयटी) आतापर्यंतच्या तपासापद्दल माहिती दिलेली नाही.