पीटीआय, नवी दिल्ली

‘‘कुठल्याही संघटनेकडे दुर्लक्ष झाले, तर संघटनेच्या चरित्रात आणि दिशादर्शनात बदल होण्याची शक्यता असते,’ असे सांगत सावध राहण्याचा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी दिला.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, ज्येष्ठ भाजप नेते मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान आणि गजेंद्र शेखावत हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भागवत म्हणाले की, ‘‘प्रत्येक संघटनेला आत्मा आणि शरीर असते. कुठलीही संघटना मोठी झाली, तर अधिक संसाधने लागतात. अशा संघटनेने राष्ट्राच्या जीवनात जागा घेतली, तर विविध प्रकारची संसाधनांची गरज भासते. संघटनेचे बाह्य रूप खराब असेल, तर अशा संघटनेकडे दुर्लक्ष झालेले असते. हे रूप समृद्ध असेल, तर संघटनेकडे मत्सरी लोक आकर्षित होतात. संघटनेकडे कधी दुर्लक्ष झाले, तर संघटना तिचे चरित्र आणि दिशाही बदलते,’’ असे मत भागवत यांनी व्यक्त केले.

कुठलीही संघटना केवळ दिखाऊ नसावी किंवा काम करण्यासाठी आवश्यक संसाधने नाहीत, असे चित्र नसावे. या ठिकाणी अधिक संतुलित, मध्यममार्ग असण्याची गरज आहे. संघटनेसाठी कटिबद्ध कार्यकर्त्यांकडून असे विचार समोर येतात असे सरसंघचालक म्हणाले.

देशाचे नशीब बदलत आहे. सारे जग भारताकडे मार्गदर्शनासाठी पाहत आहे. जगापुढे आपण योग्य आदर्श ठेवण्याची गरज आहे. आपल्याला ज्ञानाची प्राप्ती झाली असून, ऐक्याच्या भावनेतून दृष्टिकोन आत्मसात करण्याची गरज आहे.मोहन भागवतसरसंघचालक