नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष साजरे करत असून वर्षभरात एक लाख हिंदू संमेलने आयोजित केली जाणार आहेत. त्यानिमित्ताने देशातील प्रत्येक गाव व घरात पोहोचण्याचे संघाचे उद्दिष्ट असेल, अशी माहिती संघाचे राष्ट्रीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
दिल्लीतील संघाच्या ‘केशव कुंज’ या मुख्यालयामध्ये प्रांत प्रचारकांची तीन दिवसांची बैठक झाली. या बैठकीत चर्चा झालेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती पत्रकार परिषदेत आंबेकर यांनी दिली. सुमारे अडीचशे प्रांत प्रचारकांचा सहभाग असलेल्या बैठकीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्ताजी होसबाळे यांच्यासह वरिष्ठ नेते सहभागी झाले.
संघाच्या रचनेनुसार ५८ हजार ९६४ मंडळे, ४४ हजार ५५ वस्त्या आहेत. या प्रत्येक मंडळ व वस्त्यामध्ये हिंदू संमेलन होईल. देशातील ११ हजार ३६० खंड- नगरांमध्ये सामाजिक सलोख्यासाठी बैठका होतील. संघानुसार देशातील ९२४ जिल्ह्यांमध्ये प्रमुख नागरिकांशी संवाद साधला जाईल. घर-घर संपर्क मोहीम राबवून देशाच्या अधिकाधिक घरांमध्ये संघाच्या विचारांची ओळख करून दिली जाईल. शताब्दी वर्षात संघाने जनसंपर्काचा व्यापक कार्यक्रम हाती घेतल्याची माहिती दिली.
मणिपूर हिंसाचार, ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा
बैठकीमध्ये मणिपूरमधील वांशिक हिंसाचारावरही चर्चा झाली. तिथे संघाचे कार्यकर्ते दोन्ही समाजांमध्ये सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मणिपूरमध्ये शांतता निर्माण होण्यास अजून काही काळ लागेल, असा दावा आंबेकर यांनी केला. प्रांत प्रचारकांच्या बैठकीमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’वरही चर्चा केली गेली. त्याचा तपशील उघड करण्यास आंबेकर यांनी नकार दिला, मात्र याबद्दल लोकांमध्ये उत्साह दिसून आला असे आंबेकर म्हणाले.