RSS leader booked for provocative speech: दोन समाजात तेढ निर्माण होईल असे चिथावणीखोर विधान केल्याबद्दल राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे नेते कल्लाडका प्रभाकर भट यांच्या विरोधात दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बंटवल येथील एका शोकसभेत बोलत असताना भट यांनी भडकाऊ विधान केले होते. मागच्या महिन्यात मंगळुरू शहराच्या हद्दीत सुहास शेट्टी नावाच्या गुन्हेगाराची हत्या करण्यात आली होती. त्याच्या शोकसभेचा कार्यक्रम १२ मे रोजी कवलापदुर गावात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केलेले विधान भट यांना भोवले आहे.
बजरंग दलाचा कार्यकर्ता असलेल्या सुहास शेट्टीची १ मे रोजी हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल होते. २०२२ साली मोहम्मद फाझीलच्या हत्याप्रकरणात शेट्टी मुख्य आरोपी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भट यांनी ५०० जणांच्या उपस्थितांसमोर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे विधान केले होते.
बंटवालच्या ग्रामीण पोलिसांनी यानिमित्त एफआयआर दाखल केला. भट यांच्या विधानामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हा धोका लक्षात घेता सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३ (२) नुसार सांप्रदायिक शांतता भंग करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, भट यांच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सांप्रदायिक तणाव उद्भवू न देता शांतता राखण्यासाठी सदर पाऊल उचलल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सुहास शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत ११ लोकांची अटक करण्यात आली आहे. शेट्टी अट्टल गुन्हेगार होता. त्याच्यावर मंगळुरू शहरात चार तर दक्षिण कन्नड जिल्ह्यात एक गुन्हा दाखल आहे. २८ जुलै २०२२ रोजी मोहम्मद फाझीलच्या (२३) हत्या प्रकरणात तो प्रमुख आरोपी होता.
कर्नाटकमध्ये गेल्या काही काळापासून धार्मिक तणावातून काही हत्या झाल्या आहेत. याची दखल राज्य सरकारने घेतली असून गुरूवारी अनेक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.