PM Modi on 100 years of RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीसोहळ्या निमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या १०० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. राष्ट्र निर्माणाच्या कार्यात १०० वर्षांत संघाने महत्त्वाचे योगदान दिले,असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संघाला वाहिलेले १०० रुपयांचे विशेष नाणे आणि पोस्टाच्या तिकीटाचे अनावरण केले. १०० रुपयांच्या नाण्यावर भारत मातेची प्रतिमा कोरण्यात आली आहे. यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच नाण्यावर भारतमातेला स्थान मिळाले आहे. दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शताब्दीनिमित्त काढलेल्या १०० रुपयांच्या विशेष नाण्यावर “राष्ट्राय स्वाहा, इदम राष्ट्राय, इदम ना माम” असा संदेश कोरला आहे. “सर्वकाही राष्ट्राला समर्पित आहे, सर्व काही राष्ट्राचे आहे, माझे काहीही नाही”, असा या सुभाषिताचा अर्थ होतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राष्ट्र प्रथम ही संघाची विचारसरणी होती. त्यामुळे ब्रिटिश आणि निजामाच्या राजवटीत संघाला प्रचंड त्रास सहन करावा लागला.
संघाची शताब्दी आणि विजयादशमी हा योगायोग नाही
शताब्दी सोहळ्यात बोलत असताना मोदी म्हणाले, उद्या विजयादशमी आहे. या सणाचे आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाईटावर चांगल्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय आणि अंधकारावर प्रकाशाचा विजय हे सणाचे प्रतीक आहे. १०० वर्षांपूर्वी या विजयादशमीनिमित्त संघाची स्थापना करणे हा योगायोग नव्हता. तर ते हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरा, संस्कृतीचे पुनरुत्थान होते. आपली पिढी भाग्यशाली आहे की, आपण संघाचा शताब्दी सोहळा पाहू शकलो.
स्वातंत्र्यलढ्यात हेडगेवारांना तुरूंगवास भोगावा लागला
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “संघाच्या अनेक शाखा समाजाच्या विविध घटकांसाठी काम करतात. इतक्या शाखा असूनही त्यांच्यात कधीही वाद झाले नाहीत. कारण सर्वांचा उद्देश एकच आहे. तो म्हणजे राष्ट्र प्रथम.”
“स्थापनेपासूनच संघाने राष्ट्र कार्यात स्वतःला वाहून घेतले. स्वातंत्र्य लढ्यात संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांना तुरूंगवास भोगावा लागला. त्यांच्याबरोबर संघाचे अनेक सदस्यही तुरुंगात गेले होते”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी म्हटले की, संघाने स्वातंत्र्य चळवळीत अनेकदा भाग घेतला होता आणि कित्येक स्वातंत्र्यवीरांना निवारा आणि मदत देण्याचे काम केले.
पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटले, १९४२ साली महाराष्ट्रातील चिमूर येथील आंदोलनात अनेक संघाच्या स्वयंसेवकांना ब्रिटिशांकडून त्रास सहन करावा लागला होता. एवढेच नाही तर स्वातंत्र्यानंतरही हैदराबादचे निजामांकडूनही संघाच्या स्वयंसेवकांना त्रास भोगावा लागला. गोवा आणि दादरा व नगर हवेलीच्या स्वातंत्र्यासाठीही संघाने आंदोलन केले होते.