राजकीय पक्षांमध्ये होणारे वाद काही लोकांसाठी नवीन नाहीत. जनकल्याण योजना, धोरणं, न्याय अशा अनेक मुद्द्यांवर राजकीय नेत्यांमध्ये चर्चा तसंच आरोप-प्रत्यारोप होत असतात. पण कर्नाटकमधील एक वाद चक्क अंतर्वस्त्रापर्यंत पोहोचला आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण असं घडलं आहे.

काँग्रेस नेते सिद्धरमय्या यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) निषेध करण्यासाठी चड्ड्या जाळल्या जातील असं वक्तव्य केलं होतं. याला उत्तर देताना आरएसएसने काँग्रेस कार्यालयात पाठवण्यासाठी अंतर्वस्त्रे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

नेमकं काय झालं होतं –

गेल्या आठवड्यात काँग्रेसची विद्यार्थी शाखा असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने राज्याचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांच्या घराबाहेर खाकी चड्डी जाळली. राज्यातील शालेय पाठ्यपुस्तकांच्या कथित ‘भगवीकरणा’च्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं.

यानंतर कर्नाटकातील विरोधी नेते सिद्धरमय्या म्हणाले की, “नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने पोलिसांसमोर चड्डी जाळली. मग काय झालं? आम्ही आरएसएसविरोधात निषेध नोंदवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी चड्डी जाळणार”.

याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, “सिद्धरमय्या आणि काँग्रेस पक्षाची चड्डी आधीच सैल झाली आहे. त्यांची चड्डी फाडली आहे. त्यामुळेच पुढे जाऊन त्यांनी ती जाळली आहे. उत्तर प्रदेशात त्यांची चड्डी हरवली. सिद्धरमय्यांची चड्डी आणि लुंगी चामुंडेश्वरीत हरवली आहे. यामुळेच ते संघाची चड्डी जाळण्याचा प्रयत्न करत आहेत”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा नेते नारायणस्वामी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “जर सिद्धरमय्या यांना चड्डी जाळायची असेल तर त्यांनी ती आपल्या घऱात जाळावी. मी सर्व जिल्हाप्रमुखांना त्यांना चड्डी पाठवत मदत करण्यासाठी सांगितलं आहे. मी सर्वात प्रथम सिद्धरमय्या यांना चड्डी जाळल्याने प्रदूषण होत असल्या कारणाने प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेण्याची विनंती करतो. सिद्धरमय्या या पातळीवर जातील असं वाटलं नव्हतं”. त्यामुळे आता आरएसएस कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस कार्यालयात अंतर्वस्त्र पाठवण्यास सुरुवात केली आहे.