रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या वृत्तानं खळबळ उडाली होती. रविवारी रात्री नऊच्या सुमारास व्लादिमीर पुतिन हे त्यांच्या बेडरूममध्ये खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याचं वृत्त एका टेलिग्राम चॅनेलनं दिलं होतं. यावर क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
रविवारी पुतिन हे बेडरूममध्ये खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले. जमिनीवर कोसळण्यापूर्वी पुतिन यांनी जेवणाच्या टेबलवरील काही वस्तू फरशीवर पाडल्या. या आवाजामुळे सुरक्षा रक्षकांनी बेडरूममध्ये धाव घेतली. पुतिन यांच्यावर सध्या विशेष अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत, अशी माहिती टेलिग्राम चॅनेल ‘जनरल एसव्हीआर’ने दिली होती.
हे चॅनेल रशियाचे माजी लेफ्टनंट जनरल यांच्याद्वारे चालवलं जातं. या चॅनलच्या माध्यमातून नियमितपणे पुतिन यांच्या आरोग्याबाबत माहिती दिली जाते. याआधीही पुतिन आजारी असल्याचं वृत्त या चॅनेलनं दिलं होतं.
आता क्रेमलिनचे प्रवक्ते दमित्री पेसकोव यांनी पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या वृत्ताचं खंडण केलं आहे. सततच्या अफवांवर हसत दमित्री पेसकोव म्हणाले, “पुतिन यांची प्रकृती ठिक आहे. हे वृत्त खोटं आहे. अफवांवर माध्यमे मोठ्या प्रमाणात चर्चा करत असतात.”