गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या युक्रेन युद्धामुळे जग अण्वस्त्रयुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेन सहज पराभूत होणार असं वाटत असताना सहा महिन्यांपासून रशियन सैन्याला जेरीस आणण्याचं काम युक्रेननं केलं आहे. या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आता एक मोठं पाऊल उचललं आहे. रशियाची तब्बल तीन लाखांची राखीव फौज पुतीन यांनी युक्रेन सीमेवर तैनात करण्यासाठी हलवली आहे. पाश्चात्य राष्ट्रांकडून रशियाला धोका असल्याचं सांगत हा निर्णय घेतल्याचं पुतीन यांनी सांगितलं आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच…
याआधी सोव्हिएत रशियानं दुसऱ्या महायुद्धात अशा प्रकारे राखीव फौजा बाहेर काढल्या होत्या. त्यानंतर आता पहिल्यांदाच या फौजा रशियानं सीमारेषेवर तैनात केल्या आहेत. त्यामुळे पुढे होऊ घातलेल्या मोठ्या युद्धाचीच ही नांदी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, त्यात आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अण्वस्त्रांच्या वापराबाबत मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाले पुतीन?
पुतीन यांनी रशियन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “जर रशियाच्या सीमारेषांना धोका निर्माण झाला, तर आम्ही रशिया आणि आमच्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व मार्गांचा वापर करू यात कोणतीही शंका नाही. या फक्त हवेतल्या बाता नाहीत”, असं पुतीन म्हणाले.
पाश्चात्य देशांचा कट
दरम्यान, यावेळी बोलताना पुतीन यांनी पाश्चात्य देश रशियाविरोधात कट करत असल्याचा गंभीर आरोप केला. “रशियाला उद्ध्वस्त करण्यासाठी पाश्चात्य देश कट कारस्थान करत होते. रशियाविरोधात अण्वस्त्राचा वापर करण्याची योजना देखील आखली जात होती. युरोपियन युनियन, अमेरिका आणि ब्रिटन युक्रेनला रशियामध्ये लष्करी कारवाई करण्यासाठी उद्युक्त करत आहेत”, असा दावा पुतीन यांनी केला आहे.
“पाश्चात्य देशांच्या रशियाविरोधी कारवायांमध्ये त्यांनी सर्व सीमारेषा ओलांडल्या आहेत. पण जे आम्हाला अण्वस्त्रांची भीती दाखवत आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवावं की हवेची दिशा कधीही बदलू शकते”, असा इशारा पुतीन यांनी दिला आहे.