एपी, इस्तंबूल
रशिया आणि युक्रेन तीन वर्षांत प्रथमच शुक्रवारी आमने-सामने शांतता चर्चा करणार आहेत. तुर्कमेनिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेसाठी दोन्ही देशांचे प्रतिनिधी इस्तंबूलमध्ये एकत्रित होत आहेत. तथापि, तीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध थांबवण्याच्या दिशेने त्वरित प्रगती होण्याची शक्यता कमी असल्याचे अधिकारी आणि निरीक्षकांचे मत आहे.

युक्रेनचे संरक्षणमंत्री रुस्तेम उमरोव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ रशियन राष्ट्राध्यक्षांचे सहाय्यक व्लादिमिर मेडिन्स्की यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला भेटणार आहेत. गुरुवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी थेट भेट नाकारली. त्यामुळे युद्ध रोखण्याच्या प्रयत्नातही अडथळा निर्माण झाला.

पुतिन-झेलेन्स्की यांच्या संभाव्य भेटीची अपेक्षा आधीच क्षीणही होती. युक्रेनने अमेरिका आणि युरोपचा तीस दिवसांच्या पूर्ण युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारला आहे, परंतु पुतिन यांनी दूरगामी अटी लादून तो नाकारला आहे.

ट्रम्प पुतिन यांना भेटणार

अबू धाबी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शक्य तितक्या लवकर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी थेट चर्चा करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगितले. शुक्रवारी तुर्कीमध्ये होणाऱ्या रशिया आणि युक्रेनमधील चर्चेला पुतिन यांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक घेण्याची सूचनाही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी केली आहे. ट्रम्प पश्चिम आशियाच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पुतिन चर्चेत सहभागी होत नसल्याने आश्चर्य वाटले नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान पुतिन यांच्याशी चर्चेनंतर भेटीचा निर्णय होईल, असे ते म्हणाले.