रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं असून गुरुवारी चौफेर हल्ले करण्यात आले. रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाल़ आहेत. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी करत बॉम्हबल्ले करण्यास सुरुवात केल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडीओ शेअर होऊ लागले. हतबल झालेल्या युक्रेनमधील नागरिकांचे फोटो, व्हिडीओ पाहून जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली.

असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या कुटुंबाला नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या सुरक्षित ठिकाणी सोडल्यानंतर मुलीच्या गळ्यात पडून रडताना दिसत आहे. नागरिकांना आसरा घेण्यासाठी ही सुरक्षित ठिकाणं तयार करण्यात आली आहेत. कुटुंबाला तिथे सोडल्यानंतर रशियन सैन्यासोबत लढण्यासाठी या पित्याला मागे थांबायचं असल्याने त्याला अश्रू आवरत नव्हते. New News EU या वृत्तसंस्थेने हे ट्वीट शेअर केलं आहे.

युद्ध पेटले! ४० सैनिकांसह ५० ठार; रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त

“आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी सोडल्यानंतर आणि रशियन सैन्यशी लढण्यासाठी मागे थांबल्यानंतर त्यांचा निरोप घेताना भावूक झालेला पिता,” असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

आठ वर्षांपूर्वी क्रिमियाचा घास घेतलेल्या रशियाने काही महिन्यांपासून युक्रेनच्या सीमेवर सैन्याचा मोठा फौजफाटा तैनात केला. गेल्या काही दिवसांत सीमेवरील हालचाली वाढल्याने युक्रेनला आपल्या प्रभावक्षेत्रात कायम ठेवण्यासाठी रशिया आक्रमणाचा मार्ग निवडेल, ही भीती खरी ठरवत अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गुरुवारी युक्रेनमध्ये ‘लष्करी कारवाई’ची घोषणा केली. गेले अनेक आठवडे युक्रेनवर आक्रमणाचा विचार नसल्याचा पुनरूच्चार करणाऱ्या पुतिन यांनी अचानक दूरचित्रवाणीवरून केलेल्या भाषणात पूर्व युक्रेनमधील नागरिकांच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचा दावा करत कारवाईचे जोरदार समर्थन केले. युक्रेनचे ‘निर्लष्करीकरण’ करण्यात येईल, असा दावा पुतिन यांनी यावेळी केला.

भारतीय विद्यार्थ्यांची परतीसाठी हाक

पुतिन यांच्या घोषणेनंतर काही क्षणांतच रशियाने युक्रेनवर हल्लासत्र सुरू केले. सुरूवातीला हवाई हल्ले करून युक्रेनचे लष्करी तळ लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर जल आणि भूमार्गे हल्ले सुरू झाले. रशियन सैन्याची वाहने क्रिमियामार्गे युक्रेन सरकारनियंत्रित भागांत घुसविण्यात आली. युक्रेनमधील हवाई तळांसह ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा रशियाने केला.

युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाशी सर्व राजनैतिक संबंध तोडून देशात लष्करी कायदा लागू केला. देशातील नागरिकांना स्वरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची मुभा देत झेलेन्स्की यांनी रशियाविरोधात नेटाने लढण्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र, रशियाच्या शक्तिशाली सैन्यापुढे युक्रेनची संरक्षण यंत्रणा तोकडी पडली. रणगाडे आणि शस्त्रसज्ज रशियन सैन्याच्या हल्ल्यानंतर राजधानी किवबरोबरच अन्य शहरांत जीव वाचविण्यासाठी नागरिकांची एकच धावाधाव सुरू झाली. सुरक्षित आसरा शोधण्यासाठी रेल्वे स्थानके आणि रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रशियाच्या या हल्ल्याचा अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी निषेध करत नवे निर्बंध लागू करण्याची घोषणा केली. ‘नाटो’ने सर्व सदस्यदेशांच्या संरक्षणाची ग्वाही देत कोणतीही आगळीक खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा रशियाला दिला असून, या युद्धाची भयछाया जगभर पसरली आहे.