Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये मागील जवळपास तीन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षात आतापर्यंत हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. एवढंच नाही तर आतापर्यंत दोन्ही बाजूंचे शेकडो सैनिक देखील मृत्युमुखी पडले आहेत. मात्र, तरीही रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अजूनही थांबलेला नाही. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हवाई तसेच क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. त्यामुळे हा संघर्ष जगाला परवडणारा नाही. त्यासाठी हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. मात्र, अमेरिकेच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाही.

हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. मात्र, अमेरिकेच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाही. असं असतानाच आता रशिया आणि युक्रेन संघर्षासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियामध्ये शिक्षणासाठी गेलेल्या एका भारतीय तरुणाची थेट युक्रेनमध्ये लढण्यासाठी रवानगी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

भारतातील उत्तराखंड येथील उधम सिंह नगरमधील एक तरुण जो नुकताच उच्च शिक्षणासाठी रशियाला गेला होता. मात्र, त्याला रशियन सैन्यात भरती होण्यास भाग पाडण्यात आलं असून तो रशिया-युक्रेनमधील संघर्षात लढण्यासाठी त्याला पाठवण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून त्यांचा त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्या तरुणाचं नाव राकेश कुमार ( ३० वर्ष) असं असून त्याच्या कुटुंबाने परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिलं असून मॉस्कोमधील भारतीय दूतावासाकडून मदत मागितली आहे.

तसेच त्याला परत घरी आणण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. सितारगंज तहसील अंतर्गत येणाऱ्या कुशमोथ गावातील राकेश रहिवाशी आहे. तो ७ ऑगस्ट रोजी सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात अभ्यास व्हिसावर रशियात गेला होता. मात्र, तिकडे गेल्यानंतर काही दिवसांतच त्याने परिस्थिती चिंताजनक असल्याचे संकेत दिले होते.

राकेशचा मोठा भाऊ दीपू म्हणाला की, शेवटचा त्यांचा थेट संवाद ३० ऑगस्ट रोजी झाला होता. तेव्हा राकेशने त्यांना सांगितलं होतं की त्याला जबरदस्तीने रशियन सैन्यात भरती करण्यात आलं आहे. तसेच लवकरच त्याला युक्रेनमधील युद्धक्षेत्रात तैनात केलं जाईल. असं तो म्हणाला आणि त्यानंतर पुन्हा त्याच्याशी संपर्क झाला नाही. तसेच त्याने आपल्या कुटुंबाला रशियन लष्करी गणवेशातील फोटो पाठवल्याचंही त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

त्यानंतर राकेशने पुन्हा काही दिवसांनी फोन केला आणि सांगितलं की त्याचा पासपोर्ट आणि वैयक्तिक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच त्याचे अधिकृत ईमेल डिलीट करण्यात आले आहेत. तसेच युद्धभूमीवर पाठवण्यापूर्वी त्याला त्याने डोनबास प्रदेशात लष्करी प्रशिक्षण दिलं जात आहे. दीपूने म्हटलं की, “तो जिवंत आहे की नाही हे आम्हाला माहित नाही. आम्हाला फक्त सरकारने त्याला सुरक्षितपणे घरी परत आणावं अशी आमची इच्छा आहे.”