अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी रशिया युक्रेनदरम्यान युद्ध सुरु झाल्यानंतर भारतासोबत चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. नोव्हेंबर महिन्यापासून युक्रेनच्या सीमा भागांमध्ये लष्कराची जमवाजमव करणाऱ्या रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला. रशियाने युक्रेनवर चौफेर हल्ले करत पहिल्याच दिवशी ७४ लष्करी तळ उद्धवस्त केले. यामध्ये ५० हून अधिक जण मारले गेल्याचा दावा केला जातोय. एकीकडे हे युद्ध भडकलं असतानाच दुसरीकडे अमेरिकने या संघर्षासंदर्भात कोणतंही पाऊल उचलण्याआधी भारताशी चर्चा करणार असल्याचं म्हटलंय.

पुतिन यांचा आक्रामक पवित्रा…
पुतिन यांनी गुरुवारी युक्रेनमध्ये ‘लष्करी कारवाई’ची घोषणा केली़ गेले अनेक आठवडे युक्रेनवर आक्रमणाचा विचार नसल्याचा पुनरूच्चार करणाऱ्या पुतिन यांनी अचानक दूरचित्रवाणीवरून केलेल्या भाषणात पूर्व युक्रेनमधील नागरिकांच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचा दावा करत कारवाईचे जोरदार समर्थन केल़े युक्रेनचे ‘निर्लष्करीकरण’ करण्यात येईल, असा दावा पुतिन यांनी यावेळी केला.

नक्की वाचा >> Russia vs Ukraine War: रात्री उशीरा पंतप्रधान मोदींचा पुतिन यांना फोन; फोनवर म्हणाले, “रशियाचे…”

पुतिन यांनी दिला इशारा…
युक्रेनबाबत आपण केलेल्या कृतींमध्ये कुणीही हस्तक्षेप केल्यास त्याला इतिहासात कधीही पाहिले नसतील असे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही पुतिन यांनी इतर राष्ट्रांना दिलाय. याच धमकीमुळे परिस्थिती तणावाची झाली असली, तरी युरोपमध्ये मोठे युद्ध भडकण्याच्या भीतीने कुणाही देशाने स्वत:हून लष्करी हालचाल करण्याचे आणि युक्रेनचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिलेले नाही. 

नक्की पाहा हे फोटो >> मेट्रो स्थानकांत आश्रय, ATM समोरील रांगा, गाड्यांची गर्दी, रस्त्यावर तोफा अन्…; युक्रेन युद्धाची दाहकता दाखवणारे फोटो

बायडेन नक्की काय म्हणाले?
याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी व्हाइट हाऊसमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना बायडेन यांनी भारताचा उल्लेख केला. “आम्ही (युक्रेन संघर्षासंदर्भात) भारतासोबत चर्चा करणार आहोत. आमची यासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही,” असं बायडेन म्हणाले. रशियाने केलेल्या आक्रमणाविरोधातील अमेरिकेच्या भूमिकेला भारताचा पाठिंबा आहे काय या प्रश्नावर उत्तर देताना बायडेन यांनी हे उत्तर दिलंय. युक्रेनवरील हल्ल्यासंदर्भातील अमेरिका आणि भारताची भूमिका समान नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत नाहीय. भारत आणि रशियाचे कायमच मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. तर अमेरिकेसोबतचे भारताचे संबंध मागील १५ वर्षांमध्ये अधिक दृढ झाले आहेत.

नक्की पाहा >> Video: रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर रशियात दाखल झालेले पाकिस्तानी PM विमानातून उतरल्या उतरल्या म्हणाले…

भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क…
बायडेन प्रशासनाने अनेक स्तरांवर ज्यामध्ये व्हाइट हाऊस, राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या माध्यमातून भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून युक्रेनसंदर्भातील भूमिकेसाठी भारताचा पूर्ण पाठिंबा असावा यावर सविस्तर चर्चा केलीय. मात्र भारताने घेतलेल्या सावध भूमिकेसंदर्भात अमेरिका नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

भारताचा सावध पवित्रा
रशियाने युक्रेनमध्ये ‘लष्करी कारवाई’ची घोषणा केल्यानंतर पाश्चात्य देशांमध्ये निषेधाचा सूर उमटला. भारताने मात्र सावध भूमिका घेतली. या घडामोडींबद्दल खेद व्यक्त करणारे निवेदन सरकारने गुरुवारी सकाळी प्रसृत केले. त्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युरोपीय महासंघातील पदाधिकारी, ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री यांच्यासह अनेकांशी चर्चा करून तोडगा काढण्याबाबत चर्चा केली. मात्र, भारत हा रशियाच्या हल्ल्याचा स्पष्ट शब्दांत निषेध करत नसल्याचे चित्र पाश्चात्य देशांमध्ये निर्माण झाले.

नक्की वाचा >> Russia-Ukraine Crisis : पुतिन यांना इंग्रजी येतं का?; त्यांना किती आणि कोणत्या भाषा येतात?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी-पुतिन चर्चा…
दरम्यान, गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन युक्रेनसंघर्षासंदर्भात चर्चा झाली. पुतिन यांनी सध्या घडलेल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी, ‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,’ या भूमिकेचा पुनरूच्चार करून हिंसाचार थांबविण्याचे आवाहन पुतिन यांना केल्याचं भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटलंय.