युक्रेनने क्रायमियातील सैन्य माघारी घेण्याचे आदेश दिले आहेत. क्रायमियाचा ताबा नुकताच रशियाने घेतल्यानंतर तिथे रशियाचे सैन्य जास्त तर क्रायमियाचे कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे.
क्रायमियातील युक्रेनचा आणखी एक तळ रशियाने ताब्यात घेतल्याने युक्रेनने सैन्य माघारीची घोषणा केली आहे. दरम्यान हेग येथे जागतिक नेत्यांची सुरक्षा शिखर परिषद होत असून त्यात पूर्व-पश्चिम यांच्यात शीतयुद्धोत्तर काळात प्रथमच संघर्षांवर चिंता व्यक्त करण्यात आली. युरोप व अमेरिकेने यांचा युक्रेन सरकार व युक्रेनच्या जनतेला पाठिंबा दिला आहे, रशियाने जी कृत्ये केली त्याची किंमत त्यांना मोजायला लावू, असे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.
नेदरलँड्स येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी वार्ताहरांना सांगितले, की आम्ही युक्रेनच्या पाठीशी आहोत. ओबामा हे जी-७ देशांच्या परिषदेसाठी येथे आले असून त्यांनी रशियाला परिणाम भोगण्यास तयार राहण्याचा इशारा दिला आहे.
नाटोच्या एका वरिष्ठ कमांडरने सांगितले, की युक्रेनच्या पूर्व सीमेवर रशिया सैन्याची जमवाजमव करीत असून त्याकडे आमचे गांभीर्याने लक्ष आहे. पूर्व युरोपीय देशांवर धाक जमवण्याच्या हेतूने रशियाचे अध्यक्ष पुतिन त्यांच्या सैन्याच्या हालचाली करीत आहेत.
युक्रेनचे हंगामी अध्यक्ष तुरच्योनोव यांनी सांगितले, की सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना युक्रेनच्या मायभूमीत सामावून घेतले जाईल. क्रायमियाचे रशियाधार्जिणे उपपंतप्रधान तेमीरगालीयेव यांनी सांगितले, की काही सैनिक रशियाबरोबर येत आहेत तर काही युक्रेनच्या बाजूने असून ते परत जात आहेत. काळा समुद्र द्वीपकल्पात युक्रेनच्या सैन्याचे धैर्यच खचले असून पूर्व क्रायमियातील फेडोसिया बंदरावरील नौदल तळही रशियाच्या हाती गेला.