Russian Minister Roman Starovoit Case : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य रोमन स्टारोवोइट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. मात्र, हकालपट्टी केल्यानंतर काही तासातच रोमन स्टारोवोइट यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. स्टारोवोइट यांचा मृतदेह एका कारमध्ये आढळून आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळे रशियात मोठी खळबळ उडाली आहे. रोमन स्टारोवोइट हे मे २०२४ पासून वाहतूक मंत्री म्हणून कार्यरत होते.
व्लादिमीर पुतिन यांनी मंत्रिमंडळातून काढल्यानंतर रोमन स्टारोवोइट यांना यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. रशियाच्या तपास यंत्रणाच्या समितीने या संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. निवेदनात म्हटलं की, “आज रशियन फेडरेशनचे माजी वाहतूक मंत्री रोमन स्टारोवोइट यांचा मृतदेह त्यांच्या खासगी कारमध्ये आढळून आला आहे. त्यांनी स्वतःवर गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे”, असं निवेदनात म्हटलं. रशियन वृत्तसंस्थांच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.
दरम्यान, रोमन स्टारोवोइट यांचा मंत्रिमंडळात एक वर्षांपेक्षा जास्त काळ सहभाग होता. मात्र, रोमन स्टारोवोइट यांची मंत्रिमंडळातून अचानक हकालपट्टी करण्यात आल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळामधून काढून का टाकण्यात आलं? या विषयी रशियात अनेकांनी सवाल उपस्थित केले आहेत. आता रोमन स्टारोवोइट यांच्या जागी उपपरिवहन मंत्री आंद्रेई निकितिन यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
रशियन तपास समितीच्या म्हणण्यानुसार, रोमन स्टारोवोइट हे एका ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या त्यांच्या खासगी कारमध्ये आढळून आले आहेत. तेव्हा त्यांच्या मृतदेहाशेजारी एक बंदूक आढळून आली आहे. प्राथमिक तपासात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार रोमन स्टारोवोइट यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं असल्याची शक्यता आहे.
रोमन स्टारोवोइट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप
दरम्यान, रोमन स्टारोवोइट यांनी गोळी झाडून जीवन संपवल्याच्या घटनेनंतर स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, रोमन स्टारोवोइट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याची चर्चा होती. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.