पीटीआय, मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आठवडाभरात दुसऱ्यांदा भारताविषयी गौरवोद्गार काढले आहेत. भारताच्या विकासातील यशोकथेची प्रशंसा करताना त्यांनी म्हटले, की भारतीय अत्यंत प्रतिभावान आणि ध्येयवादी आहेत. आपल्या देशाच्या विकासासाठी ते आपले योगदान सातत्याने देत आहेत.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ७ आणि ८ नोव्हेंबरला रशियाचा दौरा करणार आहेत. त्याआधी पुतिन यांनी हे वक्तव्य केल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. शुक्रवारी रशियाच्या राष्ट्रीय एकता दिनी ‘रशियन हिस्टॉरिकल सोसायटी’च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या बैठकीत बोलताना पुतिन म्हणाले, की भारताकडे पहा. अतिशय प्रतिभावान, ध्येयवादी आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध नागरिकांमुळे भारत आपल्या विकासामध्ये नवी उंची निश्चित गाठेल. भारताची दीड अब्ज लोकसंख्या निश्चितच विकासाचे ध्येय गाठेल, यात शंका नाही.

रशियन सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले, की पुतिन यांनी वसाहतवाद आणि रशियाच्या संस्कृतीबद्दलही भाष्य केले. पुतिन यांनी गेल्या गुरुवारीही रशियाच्या भारतासोबतच्या मैत्रीचा पुनरुच्चार केला होता. ते म्हणाले होते, की आमचे भारतासोबत विशेष संबंध आहेत. जे अनेक दशकांपासून घनिष्ठ आहेत. भारतासह रशियाच्या संबंधांत कधीही कोणतेही वादग्रस्त मुद्दे नव्हते. आम्ही नेहमीच एकमेकांना पाठिंबा दिला आहे. हे संबंध भविष्यातही ते असेच राहतील. आपल्या देशाच्या हितासाठी ‘स्वतंत्र परराष्ट्र धोरण’ अवलंबल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रशंसा केली होती. भारताने ब्रिटिश वसाहत ते आधुनिक राष्ट्र असा विकासाचा मोठा पल्ला गाठला आहे, असेही पुतिन म्हणाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक घडामोडींची पार्श्वभूमी : रशिया व भारताची मैत्री काळाच्या निकषावर टिकली आहे. रशिया हा भारताचा दीर्घकाळ भागीदार आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात रशियाला महत्त्वाचे स्थान आहे. गेल्या काही महिन्यांत भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात कच्च्या खनिज तेलाची आयात वाढवली आहे. याबाबत अनेक पाश्चात्य देशांनी नाराजी व्यक्त केली आहे. युक्रेनवरील रशियन आक्रमणाचा भारताने अद्याप निषेध केलेला नाही. हा प्रश्न मुत्सद्दी मार्ग व संवादाद्वारे सोडवावा, अशी भारताची भूमिका आहे. १६ सप्टेंबर रोजी उझबेकिस्तानातील समरकंदमध्ये पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदींनी आजचे युग युद्धाचे नसल्याचे सांगितले होते.