मास्टर ब्लास्टर आणि खासदार सचिन तेंडुलकरने उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील शाळेच्या बांधकामासाठी ४० लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. शाळेत पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ही मदत देण्यात आली आहे. सचिन तेंडुलकरने खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून ही मदत दिली आहे. दुर्गमुल्ला येथील इंपीरिअर एज्युकेशन एन्सिट्यूटची २००७ मध्ये स्थापना झाली आहे. शाळेच्या पुढील कामासाठी सचिनने ४० लाखांची आर्थिक मदत दिली आहे. सचिनने याआधी अनेक शैक्षणिक योजनांसाठी मदत दिली आहे.

शाळेने १० नवे वर्ग, ४ प्रयोगशाळा, प्रशासकीय कक्ष, ६ प्रसाधनगृहे, सभागृह उभारण्यासाठी मदतीची विनंती केली होती. विशेष म्हणजे दुर्गमुल्लामधील ही एकमेव शाळा आहे जिथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत एकूण १ हजार विद्यार्थी आहेत.

राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही केलेल्या मदतीबद्दल सचिनचे आभार मानले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून आभार मानताना त्यांनी मैदानाबाहेरही तुम्ही प्रेरित करत असल्याचं म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन तेंडुलकरला खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून शाळा आणि शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी ७.४ कोटी रुपयांची निधी मंजूर झाला आहे. सचिन तेंडुलकर नेहमीच शाळांच्या विकासासाठी आणि इतर समाजकार्यासाठी पुढाकार घेताना दिसतो. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतरही सचिनने मुंबईतील फूटओव्हर ब्रिजसाठी २ कोटींची मदत दिली होती.