पीटीआय, लखनऊ
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला उत्तर प्रदेशात ११ जागा देऊ केल्या असल्याचे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी जाहीर केले. काँग्रेसबरोबर आघाडीला ‘चांगली सुरुवात’ झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यासंबंधीचा निर्णय काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी दिली.
अखिलेश यादव यांनी ‘एक्स‘वर लिहिले की, काँग्रेसला ११ चांगल्या जागा देऊन आमच्या सौहार्दपूर्ण आघाडीला चांगली सुरुवात होत आहे. यामुळे आघाडीचा विजय निश्चित असून मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक यांचा आम्हाला पाठिंबा कायम राहील असा दावा यादव यांनी केला. मात्र, काँग्रेसला देऊ करण्यात आलेल्या ११ जागा कोणत्या याबद्दल आता काही माहिती देऊ शकत नाही, असे सपचे नेते राजपाल कश्यप यांनी सांगितले.
या घडामोडींबद्दल अधिक माहिती देताना सपचे मुख्य प्रवक्ता राजेंद्र चौधरी म्हणाले की, ‘‘आम्ही त्यांना ११ जागा देऊ केल्या आहेत. जेणेकरून आमच्यात सन्मानजनक परस्परसमन्वय असेल आणि आम्ही भाजपचा पराभव करू शकू’’. मात्र, काँग्रेसला ११पेक्षा जास्त दिल्या जाण्याची शक्यता नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सपने राष्ट्रीय लोक दलाला सात जागा दिल्या असून या १८ जागा होतात. समाजवादी पक्षा ६२ जागांवर निवडणूक लढवेल असे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत.
हेही वाचा >>>राजकीय गदारोळात विनोद तावडे बिहारमध्ये दाखल, भाजपा नितीश कुमारांना समर्थन देणार?
दरम्यान, यादव यांच्या ‘एक्स’वरील पोस्टविषयी विचारले असता, चर्चा सकारात्मकपणे सुरू असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिल्लीमधील पत्रकार परिषदेत सांगितले. पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत हे अखिलेश यांच्याशी चर्चा करत असल्याचे ते म्हणाले. जागावाटपाचे सूत्र ठरल्यानंतर त्याविषयी माहिती दिली जाईल असे त्यांनी सांगितले.
११ मजबूत जागांनी काँग्रेसबरोबर आमच्या सौहार्दपूर्ण आघाडीला चांगली सुरुवात होत आहे. हा प्रवास विजयाच्या समीकरणासह आणखी पुढे सुरू राहील. ‘इंडिया’ महाआघाडी आणि ‘पीडीए’ (मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक) यांच्या धोरणाने इतिहास बदलेल. – अखिलेश यादव, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
‘‘चर्चा अतिशय सकारात्मक आणि चांगल्या वातावरणात सुरू असून लवकरच चांगला परिणाम दिसून येईल’’. – जयराम रमेश, काँग्रेसचे सरचिटणीस