Sameer Wankhede claim he getting threats from Pakisan UAE : नेटफ्लिक्सवरील बॅड्स ऑफ बॉलिवूड ही आर्यन खान दिग्दर्शित वेबसीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मधील काही दृष्यांवर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी आक्षेप घेतला आहे. ही सीरिजची शाहरुख खानच्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंटने निर्मिती केली असून ती नेटफ्लिक्सची प्रदर्शित झाली आहे . इतकेच नाही तर वानखेडे यांनी याबाबत मानहानीचा खटला दाखल केला आहे. यानंतर आता समीर वानखेडे यांनी दावा केला आहे की, त्यांच्या कुटुंबाला पाकिस्तान आणि यूएई आशा वेगवेगळ्या देशांमधून धमक्यांचे मेसेज पाठवले जात आहेत. मात्र असे असले तरी आपण घाबरणार नाहीत आणि सत्य नक्कीच बाहेर येईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

या सीरिजमध्ये त्यांचे चित्रण करण्यात आल्याचा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे. दरम्यान आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या या नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये त्यांचे चित्रण हे आर्यन खानविरोधातील ड्रग्ज केसमुळे करण्यात आले आहे का? असे विचारले असता समीर वानखेडे म्हणाले की, त्या प्रकरणात अनेक आरोपी होते आणि हे त्यांचे काम होते. “या या लढ्यात काहीही झाले तरी, मी लढण्यासाठी तयार आहे. मी आव्हानांना घाबरत नाही आणि नेहमीच लढलो आहे,” असेही समीर वानखेडे यावेळी म्हणाले. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

चित्रपटात ‘सत्यमेव जयते’ची खिल्ली उडवण्यात आली आहे आणि पोलीस अधिकार्‍यांचा अवमान करण्यात आला आहे, असा आरोपही वानखेडे यांनी यावेळी केला. सीरिजमध्ये पोलिसांच्या विरोधात दाखवण्यात आलेले व्यंग हे अस्वीकार्य आहे आणि म्हणूनच त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी सांगितले.

माजी एनसीबी अधिकारी वानखेडे यांनी दावा केला की, त्यांच्या कुटुंबाला युएई, बांगलादेश आणि पाकिस्तान अशा देशांमधून धमक्या आणि अश्लील मेसेजेस पाठवले जात आहेत. यावेळी त्यांनी असाही दावा केला की, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या आहेत, मात्र त्यांनी आपण मागे हटणार नाहीत असे जोरकसपणे सांगितले. तसेच त्यांच्या कुटुंबाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचेही ते म्हणाले.

वानखेडे पुढे म्हणाले की, ते गेल्या १९ वर्षांपासून देशासाठी लढत आहेत आणि यापुढेही लढत राहातील. ते पुढे म्हणाले, “सत्याची मोडतोड केली जाऊ शकते पण त्याला पराभूत केले जाऊ शकत नाही.” वानखेडे यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्सविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी या प्रकरणाच्या संदर्भात रेड चिलीज एन्टरटेन्मेंट आणि नेटफ्लिक्सला समन्स जारी केले. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. सध्यातरी न्यायालयाने कोणताही अंतरिम मनाई आदेश दिला नाही, परंतु प्रतिवादींना वानखेडे यांच्या अर्जावर त्यांचे उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. वानखेडे यांनी त्यांच्या अर्जात विविध वेबसाइट्सवरून कथित मानहानीकारक कंटेन्ट काढून टाकण्याची मागणी केली आहे.