San Rechal प्रसिद्ध मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सॅन रेचेलने पुद्दुचेरीमध्ये तिच्या वडिलांच्या घरीच आयुष्य संपवलं आहे. वर्णभेदावर तिने घेतलेल्या भूमिकेमुळे ती मनोरंजन विश्व आणि सोशल मीडियावर चर्चेत आली होती. जवाहरलाल मेडिकल कॉलेज आणि रिसर्च रुग्णालयात उपचारांच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. तिने झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर तिला दोन रुग्णालयांमधून या ठिकाणी आणण्यात आलं होतं. मात्र तिची प्राणज्योत मालवली. सॅन रिचेलने तिच्या वडिलांच्या घरीच झोपेच्या गोळ्यांचं अति सेवन केलं होतं. त्यानंतर तिला तीन रुग्णलयांमध्ये नेण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी नेमकं या घटनेबाबत काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सॅन रेचेलला आर्थिक चणचण जाणवत होती. त्यामुळे झोपेच्या गोळ्यांचं अति सेवन केलं. तिने औषधांचा ओव्हरडोस घेतल्याचं समजताच तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आणखी एका रुग्णालयात आणि मग जवाहर मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारांच्या दरम्यान तिची प्राणज्योत मालवली. आर्थिक अडचणी आणि त्यामुळे आलेला मानसिक तणावर यातून सॅनने हे टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
सॅनला आर्थिक चणचण भासत होती, सुसाईड नोटमध्ये काय उल्लेख?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सॅन रेचेलने तिचे दागिने विकले होते. तिचे वडील तिला आर्थिक सहकार्य करत होते. मात्र ते सॅन पेक्षा त्यांच्या मुलाला जास्त मदत करत होते. पोलिसांना रेचेलची सुसाईड नोटही मिळाली आहे. माझ्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरलं जाऊ नये असं रेचेलने म्हटलं आहे. दरम्यान रेचेलने नुकतंच लग्न केलं होतं. तिच्या मृत्यूची तालुका पातळीवर चौकशी केली जाणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. तिला तिच्या लग्नातून काही त्रास नव्हता ना? याबाबतही माहिती घेतली जाईल.
सॅन रेचेल मॉडेलिंग प्रशिक्षक होती
सॅन रेचेल मॉडेलिंग प्रशिक्षक, अर्थात ‘रनवे कोच’सुद्धा होती. सॅनने ‘मिस पाँडिचेरी २०२२’चा किताब जिंकला आहे. आपल्यापैकी अनेकजणी चांगलं इंग्लिश बोलता येत नाही म्हणून इंग्लिश बोलायचंच टाळतात. इंग्लिश अस्खलित बोलता येत नसतानाही ती किती आत्मविश्वासानं स्वत:चं मत मांडू शकते, याचा प्रत्यय तिच्या मुलाखतींमधून कायमच आला आहे. सॅन तमिळ उत्तम बोलताना दिसते. कृष्णवर्णीय स्त्रीचं सौंदर्य ती मॉडेलिंगमधून उत्तम प्रकारे सादर करत होती, पण ‘इन्स्टंट गोरं होण्यासाठीच्या उपायांचा काही फायदा होत नाही. त्यापेक्षा स्वत:ला आहे तसं स्वीकारा. खरा बदल स्वत:च्या स्वीकारानंतरच जाणवेल!’ असं सॅनने व्यासपीठावरुन जगाला सांगितलं होतं. आता तिने जगाचा निरोप घेतला आहे.