तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पूत्र आणि तमिळनाडूचे युवक कल्याणमंत्री उदयनिधी स्टॅलिन हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी ‘सनातन धर्मा’वरून केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. उदयनिधी यांनी सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया अशा आजारांशी तुलना केली आहे. स्टॅलिन यांचा द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचा भाग आहे. त्यामुळे एका बाजूला भारतीय जनता पार्टी उदयनिधी यांच्यासह इंडिया आघाडीवर टीका करत आहे. तर इंडिया आघाडीतले काही नेते उदयनिधी यांचा बचाव करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उदयनिधी यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टी खूप आक्रमक झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेन – शिंदे गट) यांच्यापासून ते वेगवेगळ्या राज्यांमधील भाजपा नेत्यांपर्यंत बहुतांश लोकांनी उदयनिधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, “उदयनिधी यांच्या सनातन धर्माविषयीच्या वक्तव्याला योग्य उत्तर द्यायला हवं”. मंत्रिमंडळाच्या अनौपचारिक बैठकीत पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं आहे.

उदयनिधी यांनी निर्माण केलेल्या सनातन वादावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अनौपचारिक बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मत्र्यांना याचं योग्य उत्तर देण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर मोदी यांनी त्यांच्या मंत्र्यांना ‘इंडिया विरुद्ध भारत’ या वादावर बोलणं टाळण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्र्यांना जी-२० बैठकीदरम्यान, दिल्लीतच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सर्वांना जी-२० अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं आहे. तसेच मोदी यांनी मंत्र्यांना जी-२० बैठकीच्या काळात व्हीआयपी संस्कृतीपासून लांब राहायला सांगितलं आहे.

हे ही वाचा >> “तुझं टमरेलच वाजवतो”, पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटलांचा संताप; म्हणाले, “जातीवंत तरुणांनी…”

तमिळनाडूचे युवक कल्याण मंत्री उदयनिधी हे २ सप्टेंबर रोजी चेन्नई येथे प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका सभेला संबोधित करत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी समाजातील विषमता आणि सनातन धर्म यावर भाष्य केलं. या भाषणादरम्यान, त्यांनी सनातन धर्माची मलेरिया, डेंग्यू आणि करोना विषाणूशी तुलना केली. तसेच सनातन धर्माचे उच्चाटन करण्याची भूमिकाही मांडली. उदयनिधी म्हणाले, “सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे अशा गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं समूळ उच्चाटन करायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध करता येऊ शकत नाही. त्यांचं उच्चाटनच करायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही उच्चाटन व्हायला हवं.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanatan dharma row pm modi says udhayanidhi stalin statemet need proper response asc
First published on: 06-09-2023 at 23:30 IST