अभिनेता संजय दत्त याची उद्या पुण्याच्या येरवाडा कारागृहातून सुटका होत आहे. मात्र, तुरूंगातून बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांचा ससेमिरा टाळण्यासाठी संजय दत्त चार्टर्ड विमानाने मुंबईत दाखल होणार आहे. पुणे ते मुंबई एक्स्प्रेस महामार्गाचा प्रवास तीन तासांचा असला तरी यावेळी मोठ्या संख्येने प्रसारमाध्यमांची वाहने त्याच्या मागावर राहतील. याशिवाय, सध्या महामार्गाच्या दुरूस्तीचेही काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता संजय दत्तला चार्टर्ड विमानाचा पर्याय सुचविण्यात आल्याची माहिती तुरूंग विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास संजय दत्त तुरुंगातून बाहेर येणार आहे. अन्य आरोपींप्रमाणेच संजयलाही तुरुंगातून बाहेर सोडण्यात येईल. तुरुंगातून बाहेर पडताना जेल कर्मचाऱ्यांना तो संजय दत्तच असल्याची ओळख पटवावी लागेल. त्याला नेण्यासाठी पत्नी मान्यता आणि दोन्ही मुलेही येणार आहेत. संजय दत्त मुंबईला आल्यावर सर्वप्रथम सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार आहे. तिथून आई नर्गिस यांच्या समाधीचे दर्शन घेऊन तो निवासस्थानी परतेल. या पार्श्वभूमीवर वांद्र्यातील संजय दत्तच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
१९९३ मधील बॉम्बस्फोटांवेळी अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर संजय दत्तची १६ मे २०१३ ला येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला मे २०१३ मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी दीड वर्षांची शिक्षा संजयने आधीच भोगली होती. त्यामुळे पुढची साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवायची होती.