भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी खासदार संजय राऊत हे जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. दरम्यान, आज त्यांनी जम्मूमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलता त्यांनी राहुल गांधी यांचं कौतुक केलं. तसेच काश्मीरी पंडितांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारलाही लक्ष्य केलं.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
“राहुल गांधी काश्मीर ते कन्याकुमारी पायी चालले आहेत. यासाठी मोठी हिंमत लागते. आम्ही या यात्रेकडे राजकीय यात्रा म्हणून बघत नाही. त्यामुळे ‘भारत जोडो’ यात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली, तेव्हा आदित्य ठाकरेदेखील या यात्रेत सहभागी झाले होते. आज ‘भारत यात्रा’ जेव्हा शेवटच्या टप्प्यात आहे, तेव्हा मी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार या यात्रेत सहभागी झालो होतो. राहुल गांधींचे नेतृत्व आगामी काळात नक्कीच चमत्कार घडवून आणेल. त्यांची आणि आमची विचारधारा वेगळी आहे. मात्र, ते त्यांचं नेतृत्व सिद्ध करतील आणि मोदी सरकारपुढे आव्हान निर्माण करतील, हा आम्हाला विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
“काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी शक्य नाही”
देशातील तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नाबाबत बोलताना ते म्हणाले, “तिसऱ्या आघाडीचा प्रयोग अनेकदा झाला आहे. मात्र, तो यशस्वी ठरला नाही. त्यामुळे त्याचा विचार करू नये. याबाबत शरद पवार यांनीही अनेकदा मत व्यक्त केला आहे. काँग्रेसशिवाय कोणतीच आघाडी यशस्वी होऊ शकत नाही. या देशात आजही काँग्रेसचं अस्थित्व आहे, हे विसरून चालणार नाही. आज काँग्रेसकडे खासदारांची संख्या कमी आहे. मात्र, २०२४ मध्ये नक्कीच हे चित्र बदलेल”
“…तर राहुल गांधींना पंतप्रधान बनावंच लागेल”
दरम्यान, २०२४ मध्ये राहुल गांधी या देशाचं नेतृत्व करतील का? असं विचारला असता, “या देशाचं नेतृत्व कोणीही करू शकतो. या देशात लोकशाही आहे. मात्र, राहुल गांधी यांनी स्वत: पंतप्रधान बनायचं नाही, असं सांगितलं आहे. पण लोकांना वाटलं तर राहुल गांधींना पंतप्रधान बनावंच लागेल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
