‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिन विरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये केरळच्या पीएमएलए न्यायालयात सुरु असलेल्या कार्यवाहीवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (१० एप्रिल) स्थगिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सँटियागो मार्टिनच्या विरुद्ध केरळच्या पीएमएलए न्यायालयात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा खटला सुरु होता. आता या खटल्याला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणासंदर्भात ईडीचे म्हणणे काय? त्याची माहिती मागवली आहे.

सँटियागो मार्टिनच्यावतीने ज्येष्ठ वकील आदित्य सोंधी आणि वकील रोहिणी मुसा यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. यावेळी दाखल याचिकेत काय आहे? यासंदर्भात ते म्हणाले, “पीएमएलए न्यायालयात एखादा खटला हस्तांतरित केल्यानंतर पूर्व-निर्धारित किंवा अनुसूचित गुन्ह्यांची प्राथमिक सुनावणी प्राधान्याने घ्यायला हवी का? असा प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आला. यावर न्यायमूर्ती एएस ओका आणि उज्ज्वल भुईया यांनी नोटीस बजावली.

हेही वाचा : संदेशखाली प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार; कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आदेश

दरम्यान, इलेक्टोरल बाँड्सची माहिती सार्वत्रिक झाल्यानंतर यामध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे नाव समोर आले होते. यामध्ये सँटियागो मार्टिन यांचाही सहभाग होता. सँटियागो मार्टिनची कंपनी फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस या कंपनीने तब्बल १३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे निवडणूक रोखे खरेदी केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनी लाँड्रिंगच्याच्या संदर्भात मालमत्तांवर छापे

सँटियागो मार्टिनवर २०११ मध्ये तामिळनाडू आणि कर्नाटक पोलिसांनी लॉटरी व्यवसाचा संशयावरून छापा टाकला होता. तसेच २०१३ मध्ये केरळ पोलिसांनी बेकायदेशीर लॉटरी व्यवसायाचा तपास करत सँटियागो मार्टिनच्या मालमत्तांचा शोध घेतला होता. यानंतर २०१५ मध्ये करचोरी केल्याच्या आरोपावून आयकर विभागाने केरळ, तामिळनाडू कर्नाटकमध्ये सँटियागो मार्टिनच्या कार्यालयांवर आणि घरांवर छापे टाकले होते. यानंतर सँटियागो मार्टिनवर शेवटची कारवाई मे २०२३ मध्ये झाली होती. त्यावेळी ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ४५७ कोटी रुपये जप्त केले होते.