PM Modi In Gujarat: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी गांधीनगर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि भारताच्या लष्करी कारवाईची माहिती दिली. तसेच पाकव्याप्त जम्मू-काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल आग्रही होते. जोपर्यंत पाकव्याप्त जम्मू-काश्मीर भारताच्या ताब्यात येत नाही. तोपर्यंत लष्करी कारवाई थांबविण्यात येऊ नये, असे पटेल यांचे मत होते. पण त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
१९४७ साली झालेली भारताची फाळणी आणि काश्मीरवरून भारत-पाकिस्तानच्या संघर्षाबद्दल बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आपल्या ताब्यात घेण्याची त्यावेळी महत्त्वाची संधी आपण गमावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “१९४७ साली भारतमातेचे विभाजन झाले. त्यावेळी साखळदंड तुटायला हवे होते, मात्र देशाच्या भुजा कापण्यात आल्या. भारताचे तीन तुकडे करण्यात आले. ज्यावेळी फाळणी झाली, त्याच रात्री काश्मीरमध्ये पहिला दहशतवादी हल्ला झाला.” पाकिस्तान मुजाहिदीनच्या नावाखाली दहशतवाद पसरवत असून त्यांनी अवैध पद्धतीने भारतमातेचा एक भाग बळकवला आहे, असेही ते म्हणाले.
आपण या दहशतवाद्यांना त्याचवेळी संपवले असते तर आज वेगळी परिस्थिती असती. जोपर्यंत पाकव्याप्त जम्मू-काश्मीर ताब्यात येत नाही, तोपर्यंत लष्करी कारवाई थांबवली जाऊ नये, अशी सरदार पटेल यांची इच्छा होती. पण त्यांच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही आणि आता ७५ वर्षांनंतरही आपण दहशतवादाचा सामना करत आहोत. पहलगाम हे त्याचेच एक उदाहरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातमधील दाहोद, भूज आणि वडोदराचा दौरा केला. भूज येथील जाहीर सभेत बोलत असताना त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे यश सांगितले. तसेच पाकिस्तानमधील दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी तिथल्या जनतेने, तरुणांनी पुढे आले पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.