Satyajit Ray: केंद्र सरकारच्या विनंतीनंतर सत्यजीत रे यांच्या घराचं पाडकाम बांगलादेश सरकारने थांबवलं आहे. सत्यजीत रे यांच्या आजोबांनी बांधलेलं घर बांगलादेशात आहे. फाळणीनंतर ते बांगलादेशात गेलं आहे. या घराचं पाडकाम सुरु करण्यात आलं होतं, मात्र केंद्र सरकारने आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेश सरकारला हे पाडकाम थांबवण्यात यावं अशी विनंती केली होती. ज्यानंतर हे पाडकाम थांबवण्यात आलं आहे.
नेमकं हे प्रकरण काय आहे?
भारतातले महान फिल्ममेकर आणि दिग्दर्शक सत्यजीत रे यांचं वडिलोपार्जित घर बांगलादेशच्या मैमनसिंह भागात आहे. सत्यजीत रे यांचं हे घर त्यांचे आजोबा उपेंद्र किशोर रे यांनी बांधलं होतं ज्याचं पाडकाम सुरु करण्याची तयारी झाली होती. सध्या हे घर बांगलादेश सरकारच्या अखत्यारित आहे. या घराची अवस्था अगदीच खिळखिळी झाली आहे. तरीही परराष्ट्र मंत्रालयाने आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी हे घर पाडू नये म्हणून बांगलादेश सरकारला विनंती केली आहे. बांगला सांस्कृतिक पुनर्जागरणाचं प्रतीक म्हणून आम्ही या घराकडे पाहतो. त्यामुळे हे घर उद्ध्वस्त करण्यााधी थोडा विचार करा असं केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. या घराची डागडुजी करुन ते दुरुस्त करुन पुन्हा उभं कसं राहिल या पर्यायांचा विचार करता येईल असंही आवाहन केंद्र सरकारने बांगलादेश सरकारकडे केलं. तुम्हाला यासाठी जी कुठलीही मदत लागेल ती भारत सरकारकडून केली जाईल असंही सांगण्यात आलं होतं. त्यानंतर हे पाडकाम आता थांबवण्यात आलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलंं आहे.
बांगलादेशात नेमकं कुठे आहे हे घर?
बांगलादेश पुरातत्त्व खात्याच्या माहितीनुसार ढाका या शहरापासून १२० किमी अंतरावर सत्यजीत रे यांचं हे वडिलोपार्जित घर आहे. साधारण शंभर वर्षांपूर्वी हे घर उपेंद्र किशोर रे म्हणजेच सत्यजीत रे यांच्या आजोबांनी बांधलं होतं. १९४७ ला जी फाळणी झाली त्यानंतर हे घर बांगलादेशच्या अखत्यारित गेलं. आता या घराचं पाडकाम करु नये अशी विनंती भारताने बांगलादेश सरकारला केली, ज्यानंतर हे पाडकाम थांबवण्यात आलं.
बांगलादेशातील या वास्तूबाबत पुरातत्त्व खात्याने काय म्हटलंय?
बांगलादेशच्या पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, मयमनसिंहमधील रे यांचा पॅलेस गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ जीर्णावस्थेत आहे. ते पाडून त्याच्या जागी नवीन अर्धवट काँक्रीटचं बांधकाम करायचं आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या इमारतीत अनेक खोल्या असतील, असं सांगितलं जातं. मात्र स्थानिकांनी या ऐतिहासिक वास्तू पाडण्याच्या निर्णयाला विरोध होतो आहे. बांगलादेशी कवी शमीम अश्रफ यांनी डेली स्टारला सांगितलं की, अनेक वर्षांपासून स्थानिकांनी या घराच्या जतनासाठी वारंवार मागणी केली आहे, पण त्याकडे दुर्लक्ष झालं. “हे घर अनेक वर्षांपासून भग्न अवस्थेत आहे, छताला तडे गेले आहेत. तरीही अधिकाऱ्यांनी या ऐतिहासिक वास्तूंचं महत्त्व कधी समजून घेतलं नाही.” आता भारताच्या विनंतीनंतर मात्र या ठिकाणी सुरु कऱण्यात आलेलं पाडकाम थांबवण्यात आलं आहे.