“प्राण्याचा मृत्यू झाला तरी दिल्लीतील नेते श्रद्धांजली वाहतात, पण…”, राज्यपाल मलिक यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय.

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. दिल्लीतील नेते प्राणी मेला तरी त्याला श्रद्धांजली देतात, पण शेतकरी आंदोलनात ६०० हून अधिक शेतकरी शहीद झालेत, पण त्यावर कुणीही बोलत नाही, असं मत सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केलं. तसेच एक दोन लोकांच्या डोक्यात सत्तेची नशा गेल्याचंही म्हटलं. ते तेजा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या जयपूरमधील जागतिक जाट संमेलनात बोलत होते.

“६०० शेतकरी शहीद, पण त्यावर कुणीही बोलत नाही”

सत्यपाल मलिक म्हणाले, “६०० हून अधिक शेतकरी शहीद झाले इतकं मोठं आंदोलन देशानं कधीही पाहिलेलं नाही. एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाला तरी दिल्लीतील नेत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जाते, महाराष्ट्रात आगीची घटना घडली त्यावरही दिल्लीतून श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र ६०० शेतकऱ्यांच्या मृत्यूवर अद्यापही श्रद्धांजली वाहण्यात आली नाही. त्यावर कुणीही बोलत नाही. शेतकरी पार्श्वभूमीचे लोकही संसदेत उभे राहून शेतकऱ्यांसाठी प्रस्ताव मंजूर करण्यास धजावत नाही. ही चांगली परिस्थिती नाही.”

“शेतकऱ्यांसोबत ‘या’ २ गोष्टी करू नका असं मोदींना सांगितलं”

शेतकरी आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतल्याचं सत्यपाल मलिक यांनी सांगितलं. “मी खूप दुखावलो होतो आणि रागावलो होतो. मी पंतप्रधान मोदींना भेटलो आणि त्यांना ते परिस्थितीचं चुकीचं आकलन करत असल्याचं सांगितलं. या शिख किंवा जाटांना पराभूत करता येणार नाही. तुम्हाला वाटतं हे शेतकरी सहजपणे निघून जातील, पण तसं होणार नाही. त्यांच्या मागण्या मान्य करा. त्यांच्यासोबत दोन गोष्टी कधीही करू नका. एक त्यांच्यावर बळाचा वापर करू नका आणि दुसरं त्यांना मोकळ्या हाती पाठवू नका. कारण ते शेकडो वर्षे असं वर्तन विसरत नाहीत,” असं सत्यपाल मलिक यांनी सांगितलं.

“त्यांना आपला जीव देऊन किंमत चुकवावी लागलीय…”, मलिक यांचा मोदींना इशारा

मलिक यांनी शिखांच्या रागाची काही ऐतिहासिक उदाहरणंही नमूद केले. ते म्हणाले, “माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अकाली तख्त येथे ऑपरेशन ब्लूस्टार केलं. यामुळे शिख समुदाय दुखावले. याची किंमत त्यांना आपला जीव देऊन चुकवावी लागली. सैन्य दलप्रमुख जनरल ए. एस. वैद्य यांची देखील निवृत्तीनंतर पुण्यात हत्या झाली. जालीयनवाला बाग हत्याकांडानंतर जनरल डायर यांची लंडनमध्ये हत्या झाली.”

“कारगिलमध्ये सरकारच्या चुकीची किंमत शेतकऱ्यांच्या मुलांना चुकवावी लागली”

“कारगिली युद्ध झालं तेव्हा शेतकऱ्यांची २० वर्षांची मुलं पर्वतावर चढली. शत्रू कारगिलमध्ये घुसला ही सरकारची चूक होती असं मला वाटतं. मात्र, याची किंमत शेतकऱ्यांच्या मुलांना चुकवावी लागली. हा अन्याय शेतकऱ्यांसोबतच होत आहे. लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत मात्र एक दिवस यावर शेतकऱ्यांची तीव्र प्रतिक्रिया उमटू नये असं मला वाटतं. आतापर्यंत शेतकऱ्यांनी दगड उचललेला नाही,” असंही मलिक यांनी नमूद केलं.

यावेळी मलिक यांनी दिल्लीत लाल किल्ल्यावर झालेला प्रकाराचा शेतकरी आंदोलनाशी संबंध नसल्याचंही मत व्यक्त केलं.

“असं केलं तर तुम्ही आणखी मोठे व्हाल”, मलिकांचा मोदींना सल्ला

सत्यपाल मलिक म्हणाले, “मी पंतप्रधानांना सांगितलं, ‘तुम्ही राजा आहात, तुम्ही मोठे आहात. तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की तुमचं चुकलं आणि मी बरोबर असूनही तुमची वेदना सहन होत नसल्यानं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत आहे. असं केलं तर तुम्ही आणखी मोठे व्हाल. यावर मोदी काय म्हणाले किंवा त्यानी कशी प्रतिक्रिया दिली हे मी तुम्हाला सांगणार नाही.’”

“शेतकरी आंदोलनाचा भारतीय सैन्यावर परिणाम, काहीही होऊ शकतं”

“सैन्याचे दोन जनरलने सांगितलं की शेतकरी आंदोलन भारतीय सैन्य दलावरही परिणाम करत आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं. आज तुम्ही सत्तेच्या खुर्चीवर आहात, अहंकारात काहीही करत आहात. मात्र, याचे काय पडसाद पडतील हे तुम्हाला माहिती नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

“राज्यपालांना हटवलं जाऊ शकत नाही, पण…”

मलिक म्हणाले, “जेव्हा जेव्हा मी शेतकरी आंदोलनावर बोलतो तेव्हा तेव्हा दिल्लीवरून कॉल येतो की काय असं वाटतं. माझे कथिक हितचिंतक माझ्या वक्तव्यांमुळे मला कधी हटवलं जातंय याची वाट पाहतात. मात्र, राज्यपालांना हटवलं जाऊ शकत नाही. तसेच मला सोशल मीडियावर विचारतात की मला असं वाटतंय तर मी राजीनामा का देत नाही. मी त्यांना विचारतो की तुमच्या वडिलांनी मला नियुक्त केलंय का? मी मतदानाने राज्यपाल झालो नाही. मला दिल्लीतील २-३ व्यक्तींनी नियुक्त केलंय. मी त्यांच्या इच्छेविरुद्ध बोलतो आहे. ज्या दिवशी ते यावर आक्षेप घेतील आणि मला पद सोडायला सांगतील त्या दिवशी राजीनामा द्यायला मी एक मिनिटही घेणार नाही.”

“एक-दोन व्यक्तींच्या डोक्यात सत्तेची नशा गेलीय”

“मी काहीही सोडू शकतो पण शेतकऱ्यांवरील अन्याय पाहू शकत नाही. मी पदावर असताना शेतकऱ्यांचा पराभव होत आहे हे मला सहन होत नाही. यापेक्षा लज्जास्पद काहीच नाही. सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूचे लोकही आहेत. मात्र, एक-दोन व्यक्तींच्या डोक्यात सत्तेची नशा इतकी गेलीय की त्याला जमीनच दिसत नाहीये. मात्र, गावाकडे सांगितलं जातं की रावण देखील अहंकारी होता. एक दिवस यांनाही कळेल की ते चुकीचे आहेत. मला वाटतं तो दिवस लवकरच येईल. शेतकरी पराभूत होऊन दिल्लीहून परतणार नाही. ते हवे तितके दिवस आपलं आंदोलन सुरूच ठेवतील,” असंही त्यांनी सांगितलं.

“सरकार जागतिक दर्जाची महाविद्यालयं बांधण्याऐवजी नवं संसद भवन बांधतंय”

मलिक यांनी यावेळी शिक्षणाचं महत्त्व विशद केलं. जगातील विद्यापीठं शिक्षणाच्या बळावर अनेक नोबेल पारितोषिक व्यक्ती घडवत आहेत. मात्र, भारतासाठी हे प्राधान्य होत नाहीये. आपल्याकडे जागतिक स्तरावरील महाविद्यालयं नाहीत. असं असताना आपलं सरकार नवं संसदभवन तयार करण्यावर खर्च करत आहे. मला वाटतं नव्या संसदेपेक्षा जागतिक दर्जाची महाविद्यालयं उभारली पाहिजे. पण सध्या सरकार याला प्राधान्यच देत नाहीये, असं मत मलिक यांनी व्यक्त केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Satyapal malik criticize modi government over farmers protest pbs

Next Story
अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी हिंदू…”
फोटो गॅलरी