Ashoka University Professor Ali Khan Mahmudabad Bail: ऑपरेशन सिंदूरबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल हरियाणा पोलिसांनी अटक केलेल्या अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अंतरिम जामीन मंजूर केला.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन के सिंह यांच्या खंडपीठाने त्यांच्याविरुद्धच्या दोन एफआयआरमधील तपासाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि त्यांच्या पोस्टचा “डॉग व्हिसलिंग” असा उल्लेख केला. न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य पोलिस महासंचालकांना वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यास सांगितले, ज्यामध्ये एक महिला अधिकाऱ्याचा समावेश असेल.
ऑपरेशन सिंदूरबाबत सोशल मीडिया पोस्ट केल्याबद्दल सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात आणण्यासह कठोर आरोपांखाली दोन एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर महमूदाबाद यांना १८ मे रोजी अटक करण्यात आली होती.
हरियाणा राज्य महिला आयोगाने त्यांच्या अटकेच्या एक दिवस आधी दाखल केलेल्या तक्रारीवरून दाखल केलेल्या गुन्ह्यात १८ मे रोजी महमूदाबाद यांना सोनीपत येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
अलीकडेच, राज्य महिला आयोगाने त्यांना त्यांच्या टिप्पण्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी नोटीस पाठवली होती. पण, यावर महमूदाबाद म्हणाले की त्यांचा गैरसमज झाला होता आणि यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांचा मूलभूत अधिकार अधोरेखित झाला.
हरियाणा पोलिसांनी सांगितले की, महमूदाबाद यांच्याविरोधात सोनीपतमधील राय पोलीस ठाण्यात दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. एक हरियाणा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांच्या तक्रारीवर आधारित आणि दुसरे गावाच्या सरपंचाच्या तक्रारीवर आधारित आहे.
कोण आहेत अली खान मेहमूदाबाद?
अली खान महमूदाबाद यांचा जन्म २ डिसेंबर १९८२ रोजी झाला. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण लखनौच्या ला मार्टिनियर कॉलेजमधून केले. त्यानंतर ते १९९६ पर्यंत किंग्ज कॉलेज स्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले होते. २००१ मध्ये त्यांनी विंचेस्टर कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर युकेमधील केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी मिळवली.
राजकारणात प्रवेश
२०१८ महमूदाबाद यांनी राजकारणात प्रवेश केला होता. २०१९ ते २०२२ पर्यंत ते समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. जोपर्यंत ते पक्षात सक्रिय होते, तोपर्यंत त्यांची गणना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जवळच्या सहकाऱ्यांमध्ये केली जात असे. २०२२ पासून, महमूदाबाद यांच्याकडे पक्षाचे कोणतेही अधिकृत पद नसून, सध्या ते राजकारणात सक्रिय नाहीत.
महमूदाबाद हे मोहम्मद आमिर मोहम्मद खान ‘सुलेमान’ यांचे पुत्र आहेत, ज्यांना राजा साहिब महमूदाबाद म्हणून ओळखले जाते. त्यांनी शत्रू मालमत्ता कायद्यांतर्गत सरकारने जप्त केलेली त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढाईत आयुष्यातील सुमारे ४० वर्षे घालवली होती.