SCO Conference in China: सध्या चालू असलेली शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात SCO च्या बैठकीतले अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यात मोदी पुतीन यांची गळाभेट घेताना दिसत आहेत. शिवाय, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ फक्त व्हायरलच होत नसून पाकिस्तानमधील नागरिक या व्हिडीओवरून त्यांचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना ट्रोल करत आहेत.

नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग SCO परिषदेचे यजमान म्हणून पाहुणे व्लादिमीर पुतिन यांची इतर राष्ट्रप्रमुखांशी आणि मान्यवरांशी ओळख करून देताना दिसत आहेत. या रांगेतच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफदेखील उभे असल्याचं दिसत आहे. शी जिनपिंग यांनी शरीफ यांच्याआधी उभ्या असलेल्या काही व्यक्तींशी पुतिन यांची ओळख करून दिली. पण शाहबाज शरीफ यांच्यासमोर येताच अभिवादन आटोपतं घेऊन जिनपिंग तसेच पुढे चालत निघाले. एवढंच नव्हे, तर शरीफ अभिवादन करण्यासाठी पुढे येत असल्याचं पाहून जिनपिंग यांनी समोर तोंड करून चालत निघणं पसंत केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

जिनपिंग निघाले, पुतिन मात्र वळले!

दरम्यान, एकीकडे जिनपिंग यांनी शरीफ यांच्यासमोरून काढता पाय घेतलेला असताना दुसरीकडे पुतिन मात्र शरीफ यांना पाहताच थांबले आणि मागे वळले. मोठ्या अजीजीनं हात मिळवण्यासाठी पुढे येणाऱ्या शरीफ यांच्याकडे पाहून पुतिन हसले. त्यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि ज्या वेगाने ते वळले होते, त्याच वेगाने पुढे निघाले.

नेटिझन्सचा संताप!

शाहबाज शरीफ यांच्या या आविर्भावावर नेटिझन्सही संताप व्यक्त केला आहे. एका युजरने हा व्हिडीओ शेअर करून त्यासोबत हे वर्तंन अतिशय खालच्या दर्जाचं असल्याचं म्हटलं आहे. “(या परिषदेत) इतर देशांचे नेते आपली अदब सांभाळून वावरत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ मात्र पुतिन यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी मागून धावत आले. इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठीचं अतिशय वाईट वर्तन. शरीफ काय करणार हे ओळखून शी जिनपिंग यांनी दुसरिकडे पाहिलं आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं”, असं या युजरने म्हटलं आहे.

आणखी एका युजरने “पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा SCO परिषदेत खुद्द यजमान शी जिनपिंग यांनीच अवमान केला. शरीफ जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन करू इच्छित होते, पण जिनपिंग यांनी त्यांच्याकडे चक्क दुर्लक्ष केलं आणि पुढे निघून गेले. एका देशाच्या पंतप्रधानांसाठी ही लाजिरवाणी बाब आहे”, अशी प्रतिक्रिया इंडियन नावाच्या एका युजरने दिली आहे.