पीटीआय, जम्मू : जम्मू- काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात सीमेपलीकडे जाणारे एक भुयार आपण शोधून काढल्याचे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) गुरुवारी सांगितले. यामुळे, आगामी अमरनाथ यात्रेत अडथळे आणण्याचे पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मनसुबे उधळण्यात आल्याचा दावा बीएसएफने केला. यानंतर जम्मू विभागात अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

१५० मीटर लांबीचे हे भुयार सांबातील चक फकिरा सीमा चौकीच्या भागात बुधवारी सायंकाळी शोधण्यात आल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘हे भुयार शोधून काढून जम्मूतील सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांचा आगामी अमरनाथ यात्रेत अडथळे आणण्याचा डाव उधळून लावला आहे,’ असे बीएसएफचे उपमहानिरीक्षक पी.एस. संधू म्हणाले.

नुकतेच खोदण्यात आलेले हे भुयार पाकिस्तानच्या हद्दीतून सुरू झाले होते. त्याचे तोंड सुमारे दोन फूट होते आणि त्याचा बाहेर पडण्याचा मार्ग मजबूत करण्यासाठी वापरली गेलेली वाळूची २१ पोती आतापर्यंत हस्तगत करण्यात आली आहेत. दिवसाच्या उजेडात या भुयाराचा शोध घेण्यात येईल, असे संधू यांनी सांगितले. हे भुयार आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५० मीटर, तर सीमेवरील कुंपणापासून ५० मीटर अंतरावर आहे. ते भारतीय हद्दीपासून ९०० मीटरवर असलेल्या पाकिस्तानच्या चमन खुर्द (फियाझ) चौकीच्या समोरील बाजूला आहे. या भुयाराचे तोंड चक फकिरा सीमा चौकीपासून ३०० मीटरवर, तर शेवटच्या भारतीय खेडय़ापासून ७०० मीटरवर आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने ओळख उघड न करण्याच्या अटीवर दिली.