बिहारमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) आणि प्रमुख विरोधी पक्षांचे महागठबंधन या दोन प्रमुख आघाड्यांच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपासाठी चर्चा सुरू झाली. प्रत्येक पक्ष स्वतःकडे अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे या चर्चा अजून काही दिवस तरी चालण्याची शक्यता आहे.

भाजपच्या निवडणूक समितीची पाटण्यात बैठक झाली. त्यामध्ये रालोआच्या घटक पक्षांबरोबर जागावाटप करण्याविषयी चर्चा झाली. तर काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक झाली. त्यामध्ये पक्षाच्या संभाव्य उमेदवारांवर चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने बिहारसाठी २५ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.

रालोआच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त जनता दल आणि भाजप हे प्रत्येकी १०२ आणि १०१ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लोक जनशक्ती (रामविलास) पक्षाचे नेते चिराग पासवान सुरुवातीला २० ते २२ जागा लढवण्यावर समाधानी होते, मात्र त्यांनी आता आणखी २५ जागांची मागणी केली आहे. चिराग पासवान यांचा पक्ष मागील निवडणुकीत रालोआबरोबर नव्हता. रालोआचा घटक पक्ष असलेल्या हिंदुस्तानी अवामी मोर्चाचे (एचएएम) नेते आणि केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांना किमान १५ जागा हव्या आहेत.

दुसरीकडे, महागठबंधनमध्ये राष्ट्रीय जनता दल १३५ ते १४० जागा लढवण्याची शक्यता आहे. तसेच पक्षाने काँग्रेसला ५० ते ५२ जागा देऊ केल्या आहेत. काँग्रेसने मागील वेळी ७५ जागा लढवून त्यांना केवळ १९ जागा जिंकता आल्या होत्या. यंदा त्यांनी ७० जागा मागितल्या आहेत. त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महागठबंधनचा महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या भाकप (माले) पक्षाला राजदने २० ते २५ जागा देऊ केल्या आहेत. मात्र, त्यावर ते नाराज आहेत. २०२०मध्ये भाकप (माले) पक्षाने १९ जागा लढवून १२ जागा जिंकल्या होत्या. यंदा त्यांना ४० जागांची अपेक्षा आहे.