पीटीआय, अहमदाबाद/नवी दिल्ली

अहमदाबाद येथील ‘एअर इंडिया’च्या अपघातग्रस्त विमानाचा ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर’ (सीव्हीआर) हा दुसरा ‘ब्लॅकबॉक्स’ सोमवारी सापडला. यामुळे आता तपासाला अधिक वेग येणार आहे. त्याच वेळी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक सोमवारी नवी दिल्लीत झाली. यात अपघाताची संभाव्य कारणे आणि भविष्यातील उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

गुरुवारी विमानाची भीषण दुर्घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी ‘फ्लाइट डेटा रेकॉर्डर’ (एफडीआर) हा पहिला ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला होता. याच्या आधारे ‘एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’ने (एएआयबी) तपास सुरू केला असताना सोमवारी ‘सीव्हीआर’ही हाती आल्यामुळे आता अपघातापूर्वी वैमानिक आणि ‘एटीसी’, तसेच दोन वैमानिकांमध्ये आपापसात नेमके काय संभाषण झाले, हे समजणे शक्य होईल. पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांनी सोमवारी अहमदाबादेत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या वेळी केंद्र आणि राज्य सरकार, ‘एएआयबी’ आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या मदतकार्य तसेच अपघाताच्या तपासाबाबत चर्चा झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नवी दिल्लीत उच्चस्तरीय समितीच्या पहिल्या बैठकीत केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, गृह मंत्रालय, हवाई दल, गुप्तचर विभाग, गुजरात सरकार, डीजीसीए, हवाई सुरक्षा कार्यालय यांचे अधिकारी उपस्थित होते. ही समिती भविष्यात अपघात टाळण्यासाठी नवी प्रमाणित कार्यपद्धत निश्चित करण्याचे काम करणार आहे. त्याच वेळी अपघातग्रस्त विमान अमेरिकेच्या ‘बोइंग’ कंपनीचे असल्याने आंतरराष्ट्रीय नियमानुसार ‘यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड’नेही समांतर चौकशी सुरू केली आहे.