माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंग यांनी स्थापन केलेल्या वादग्रस्त लष्करी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी मुदतपूर्व निवृत्तीसाठी गेल्या आठवडय़ात अर्ज केला होता, मात्र मंगळवारी अचानक घूमजाव करीत त्यांनी अर्ज मागे घेतल्याचे समोर आले आहे.
भारतीय लष्करात हनी बक्षी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कर्नल मुनिश्वर नाथ बक्शी यांनी आरोग्य ठीक नसल्याचे कारण देत मुदतपूर्व निवृत्तीसाठी अर्ज केला होता, अशी माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.
गेली २५ वर्षे भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या बक्शी यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात मानचोपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.
जनरल व्ही के सिंग यांच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या लष्कराच्या गुप्तचर विक्षागाच्या तांत्रिक मदत विभागाचे (टीडीएस) प्रमुख म्हणून बक्शी यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र बेकायदेशीर कारवाया केल्याच्या आरोपावरून हा विभाग मे २०१२ मध्ये बंद करण्यात आला होता. या विभागावर जम्मू-काश्मीर सरकारही अस्थिर करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन टॅपिंग (दूरध्वनीवरील संभाषण चोरून ऐकणे) प्रकार उघडकीस आल्यानंतर टीडीएसच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.