बिहारमधील जन लोकशक्ती पक्षाचे प्रमुख अध्यक्ष रामविलास पासवान यांनी बुधवारी जातीयवाद आणि निधर्मीवाद या संकल्पना निव्वळ निवडणुकांपुरत्या मर्यादित असल्याचे सांगत भाजपशी हातमिळवणी करण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले. देशभरात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची लाट आल्याचा दावा यावेळी रामविलास पासवान यांनी केला. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या जातीय दंगलीबद्दल मोदींवर करण्यात येणा-या आरोपांचे खंडन करताना पासवान यांनी जातीयवाद आणि निधर्मीवाद या संकल्पना फक्त चर्चेपुरत्या सिमित असल्याचे सांगितले. दंगलीच्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणे ही देशाची गरज नसून त्यापेक्षा देशाचा विकास कशाप्रकारे होऊ शकतो याविषयी चर्चा झाली पाहिजे असे मत पासवान यांनी व्यक्त केले.