फरार आरोपी विजय मल्ल्याने आपण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती असा दावा केल्यापासून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला आहे. काँग्रेसने गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन मल्ल्या आणि जेटलींमध्ये संसदेतच पंधरा ते वीस मिनिट चर्चा झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या भेटीचे पुरावे उपलब्ध आहेत असा आरोप केला.

त्यानंतर लगेचच भाजपाने पत्रकार परिषद घेऊन गांधी कुटुंबाचे विजय मल्ल्याशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस आणि गांधी परिवाराचे विजय मल्ल्याबरोबर जवळचे संबंध होते. बुडित निघालेल्या किंगफिशर एअरलाईन्सचे मालक राहुल गांधी आहेत असे वाटते. गांधी परिवाराचा किंगफिशर एअरलाईन्सशी संबंध होता असा उलटा आरोप भाजपाने केला आहे. कागदपत्रांवरुन किंगफिशर एअरलाईन्सची मालकी मल्ल्याकडे नव्हे तर गांधी परिवाराकडे असल्याचे दिसते असा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत केला.

संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत कागदपत्रांचा एक गठ्ठा आणला होता. त्यातील त्यांनी एक पान वाचून दाखवले. हे पान म्हणजे काँग्रेस आणि विजय मल्ल्या यांच्या संबंधांचा एक पुरावा आहे असे त्यांनी सांगितले. काँग्रेस प्रणीत संपुआ सरकारच्या काळात २००८ आणि २०१२ असे दोन वेळा किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्जाची फेररचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्यांदा सरकारच्या विनंतीवरुन मल्ल्याच्या कर्जाची फेररचना करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. संपूर्ण गांधी कुटुंब किंगफिशर एअरलाईन्सच्या बिझनेस क्लासमधून मोफत प्रवास करायचे असा आरोप त्यांनी केला.

काय म्हणाले राहुल गांधी

अरुण जेटलींनी त्यांच्या ब्लॉगमधून आतापर्यंत झालेल्या सर्व बैठकांबद्दल माहिती दिली आहे पण याच भेटीबद्दल माहिती देणे त्यांनी का टाळले ? अरुण जेटली खोटे बोलत आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. अर्थमंत्र्यांनी फरार आरोपी बरोबर चर्चा केली. मल्ल्याने तो देश सोडून लंडनला चाललाय हे अरुण जेटलींना सांगितले होते, मग त्यांनी सीबीआय, ईडी किंवा पोलिसांना याची माहिती का नाही दिली? असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला आहे. अटकेची नोटीस माहितीच्या नोटीसमध्ये कशी काय बदलली ? ज्यांचे सीबीआयवर नियंत्रण आहे तेच अशा प्रकारे नोटीसमध्ये बदल करु शकतात असा आरोप राहुल गांधींनी केला.