September 2025 Monsoon Update by IMD : मुसळधार पावसामुळे देशाच्या विविध भागातील लोक नैसर्गिक आपत्तींचा सामना करत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे यंदाच्या सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या महिन्यात उत्तराखंडमध्ये मूसळधार पाऊस, नद्यांना पूर येणे व भूस्खलनाच्या घटना घडू शकतात. तसेच दक्षिण हरियाणा, दिल्ली व राजस्थानमध्ये ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत होऊ शकतं.
भारतीय हवामान विभागाने रविवारी (३१ ऑगस्ट) जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की सप्टेंबर महिन्यातील मासिक सरासरी पर्जन्यमान हे याआधीच्या याच महिन्यातील सरासरी पर्जन्यमानापेक्षा १६७.९ मिमीपेक्षा अधिक म्हणजेच १०९ टक्क्यांहून अधिक असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा म्हणाले की “उत्तर भारतातील अनेक नद्या उत्तराखंडमधून उगम पावतात. या राज्यात ढगफुटी होऊन अनेक नद्यांना पूर येऊ शकतो. अनेक नद्या तुडूंब भरून वाहतील आणि त्याचा खालच्या राज्यांना व शहरांना फटका बसेल.”
ईशान्य भारतात कमी पाऊस होणार
महापात्रा म्हणाले, “छत्तीसगडमध्ये महानदीच्या वरच्या जलसंधारण क्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. राजस्थानमधून मान्सून परतण्याची साधारण तारीख ही १ सप्टेंबरवरून १७ सप्टेंबरवर गेली आहे. केवळ उत्तराखंड व आसपासचा प्रदेश नव्हे तर देशाच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, ईशान्य व पूर्व भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल.
१ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत ७४३.१ मिमी पावसाची नोंद
१ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत देशात ७४३.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या काळात गेल्या अनेक वर्षांपासून देशात सरासरी ७००.७ मिमी पावसाची नोंद होत आली आहे. मात्र, यंदा देशात या काळात जास्त पाऊस झाला आहे. उत्तर-पश्चिम भारतात २६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २००१ नंतर यंदा या दोन महिन्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. दक्षिण भारतात ऑगस्ट महिन्यात २५०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा या भागात ३१ टक्के अधिक पाऊस झाला आहे. २००१ नंतर या महिन्यातील उत्तर-पश्चिम भागातील हा तिसरा सर्वाधिक पाऊस होता.
उत्तर पश्चिम भारतात २७ टक्के अधिक पर्जन्यमान
उत्तर पश्चिम भारतात आतापर्यंत तिन्ही महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत या भागात ६१४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी या भागात सरासरी ४८४ मिमी पावसाची नोंद होते. यंदा या भागात २७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर, दक्षिण भारतात १ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत ६०७.७ मिमी पाऊस झाला आहे. दरवर्षी या भागात सरासरी ५५६.२ मिमी पाऊस होतो. याचाच अर्थ दक्षिण भारतात ९.३ टक्के अधिक पाऊस झाला आहे.