लोकसभा निवडणुकीपूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाला हादरा बसला असून पक्षातील ८ आमदारांनी नॅशनल पीपल्स पार्टीत (एनपीपी) प्रवेश केला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार असून भाजपाला सोडचिठ्ठी देण्याऱ्यांमध्ये दोन मंत्र्यांचा देखील समावेश आहे. भाजपाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी पक्षाला रामराम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार असून या राज्यात विधानसभेच्या ६० जागा आहेत. ११ एप्रिल रोजी या राज्यात मतदान होणार असून भाजपाचे पेमा खांडू हे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने नुकतीच ५४ जागांसाठी उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर भाजपाचे ८ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत नॅशनल पीपल्स पार्टीत प्रवेश केला. विशेष म्हणजे अरुणाचल प्रदेश व अन्य राज्यात एनपीपी आणि भाजपाची युती आहे. भाजपाने उमेदवारी न दिल्याने ते सर्व नाराज होते.

अरुणाचलमधील भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष जारपूम गामलिन, गृहमंत्री कुमार वाय, पर्यटन मंत्री जारकर गामलिन या प्रमुख नेत्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपाचे विद्यमान ८ आमदार आणि १२ पदाधिकारी असे एकूण २० जण एनपीपीत सामील झाले आहे.
भाजपाने निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांना उमेदवारी नाकारली. आता आम्ही जिंकण्यासाठीच निवडणूक लढवू, असा सूचक इशाराही या नेत्यांनी भाजपाला दिला आहे.

अरुणाचल प्रदेशनंतर त्रिपुरा येथेही भाजपाच्या तीन पदाधिकाऱ्यांनी भाजपाची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपाचे त्रिपुरा येथील उपाध्यक्ष सुबल भौमिक, प्रकाश दास, देवशिष सेन यांनी भाजपाला रामराम केला आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत पूर्वोत्तर राज्यांवर विशेष लक्ष ठेवून असलेल्या भाजपाला हादरा बसला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Set back bjp in arunachal pradesh 8 mla including 2 minister join npp before assembly lok sabha election
First published on: 20-03-2019 at 07:53 IST